महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. दरम्यान, आता येत्या रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी होणार असल्याच्या चर्चा होत्या परंतु आता रविवारी होणार असल्याचे समजतेय.16 डिसेंबरपासून विधीमंडळाचं अधिवेशन असल्यामुळे 15 तारखेला नागपुरात शपथविधी होण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात महायुतीचे 34 ते 35 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार नव्या मंत्रिमंडळात भाजपचे 23 मंत्री, शिवसेना शिंदे गटाचे 13 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9 मंत्री असल्याची शक्यता आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात रविवारी भाजपचे 17 शिवसेनेचे 10 आणि अजित पवार गटाचे 7 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच यावेळी गृह आणि अर्थ असे दोनही महत्त्वाची खाती असणार आहेत.
रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्यानं नागपुरातही घडामोडींना वेग आला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्र्यांसाठी चाळीस बंगले सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.