नाशिक - राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये उत्तर महाराष्ट्रात एकूण सात आमदारांना मंत्री करण्यात आले आहे. यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हेवीवेट नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना डच्चू देण्यात आलेला आहे. त्यामुळे मोठा बदल उत्तर महाराष्ट्रमध्ये झाला असला तरी त्याचा थेट संबंध राज्यात जोडला जात आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच अँड. माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. तर नंदुरबार जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान दिले नाही.
विधानसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत प्राप्त झालं त्यानंतर त्यांचे मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा स्वतंत्र लढून मिळालेले यश लक्षात घेता मंत्रिमंडळाचा विस्तार कसा असेल यावर वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात होते. सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर त्यावेळेस इतर मंत्र्यांचा शपथविधी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निश्चित असल्याचे फडणवीस यांनी त्यावेळेस स्पष्ट केले होते.
प्रमाणे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला एकूण सात मंत्री पदे आली आहेत. त्यामध्ये भाजपाचे गिरीश महाजन यांना जळगाव मधून भाजपने पुन्हा एकदा संधी दिली आहे. गिरीश महाजन हे भाजपचे संकटमोचक मानले जातात आणि फडणवीस यांच्यासह पक्षाच्या मदतीसाठी ते कधीही धावून जातात. त्यामुळे मंत्रिमंडळात त्यांचे स्थान नक्कीच होते आणि अपेक्षेप्रमाणेच त्यांना मिळालेला आहे. येणाऱ्या काळात ते नाशिकचे पालकमंत्री होऊ शकतात. राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना यापूर्वीच्या दोन्ही मंत्रिमंडळात स्थान दिले होते. त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता आणि दुसरीकडे नगर जिल्ह्यामध्ये पक्ष वाढीसाठी राधाकृष्ण विखे पाटील यांचा मोठा फायदा होत आहे. तसेच ते काँग्रेस मधून भाजपा मध्ये आले आहे त्यामुळे याही वेळेत त्यांना संधी मिळाली आहे. जयकुमार रावल यांना शिंदखेडा मधून संधी देण्यात आलेली आहे यापूर्वी मंत्रिमंडळामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. धुळे व लगतच्या परिसरामध्ये त्यांची पकड चांगली असल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळ स्थान देण्यात आलेले आहे.
यापूर्वी त्यांनी फडणवीस सरकार मध्ये पर्यटन मंत्री म्हणून काम बघितले असून मधल्या काळात त्यांना डावलला गेल्यानंतर सुद्धा ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जळगाव मधून गुलाबराव पाटील यांना पुन्हा मंत्रिमंडळ स्थान दिला गेले आहे. यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे त्यानंतर शिंदे सरकार आणि आता फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवले आहे. गुलाबराव पाटील यांची जळगाव जिल्ह्यामध्ये एक सच्चा शिवसैनिक म्हणून चांगलीच पकड आहे आणि ओळख ही आहे त्याचा त्यांना यावेळी फायदा होत आहे. नाशिक जिल्ह्यातून दादा भुसे यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. दादा भुसे हे उद्धव ठाकरे त्यानंतर एकनाथ शिंदे आणि आता फडणवीस सरकारमध्ये मंत्री आहेत. माजी सरकारी कर्मचारी म्हणून त्यांची ओळख असली तरी एक सच्चा शिवसैनिक आणि सर्वसामान्यांसाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून दादा भुसे यांची एक वेगळी प्रतिमा आहे आणि त्याच्या त्यांना यावेळी चांगलाच फायदा होताना दिसून येत आहे. मंत्री असताना देखील त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी काम केल्याची उदाहरणे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नरहरी झिरवाळ यांना मंत्री पदाची संधी देण्यात आली आहे. यापूर्वी झिरवाळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष होते काही काळ ते विधानसभेचे अध्यक्ष राहिले. या काळामध्ये झालेल्या पक्ष फुटीचा आणि त्यावर घेतलेल्या निर्णयाचे फळ त्यांना मंत्रिपदामध्ये यावेळी मिळालेला आहे. तर सिन्नर मधून माणिक कोकाटे यांना संधी देण्यात आलेली आहे. माणिक कोकाटे हे निष्ठावंत शरद पवार यांचे असले तरी नंतरच्या काळामध्ये मात्र अजित पवार यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेशी ते एकनिष्ठ राहिले आणि सातत्याने अजित पवारांची पाठराखण करत राहिले. कोकाटे यांच्या रूपाने सिन्नरला प्रतिनिधित्व मिळाले आहे. वीस वर्षानंतर सिन्नरला राज्याच्या मंत्रिमंडळ स्थान मिळाले आहे. यापूर्वी तुकाराम दिघोळे यांच्या रूपाने शरद पवारांनी सिन्नर तालुक्याला मंत्रीपदाची संधी दिली होती.
कोकाटे हे अतिशय अभ्यासू आणि आक्रमक व्यक्तिमत्व आहे. यापूर्वी त्यांनी शिवसेना सोडताना नारायण राणे यांच्याबरोबर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी नारायण राणे यांच्याबरोबर भाजपामध्ये न जाता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रस्ता पकडला होता नंतर ते अजित पवार यांच्याबरोबर गेले आणि त्यांना या त्या एकनिष्ठेचेच फळ म्हणून मंत्री पद मिळाला आहे. त्यांच्या प्रचाराच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाट्यांना निवडून द्या मी त्यांना मंत्री करतो असे आश्वासन सिन्नर मधील नागरिकांना दिले होते. कोकाटे राज्याच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदीच मंत्री होत आहे.
भुजबळ यांना धक्का
या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये छगन भुजबळ यांना मोठा धक्का मिळाला आहे. याची वेगवेगळी कारण असली तरी त्यातील प्रमुख कारण म्हणजे राज्यस्तरावर भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवलेली नाराजी त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गद्दारी करत अपक्ष उमेदवारी अर्ज नांदगाव मतदारसंघातून दाखल केला होता. त्या ठिकाणी त्यांना माघार घेण्याचे सांगण्यात आल्यानंतरही समीर भुजबळ यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नाशिक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात दोन ठिकाणी उमेदवार देण्यात आले. त्यामुळे एक प्रकारे अजित पवार यांच्या एकनिष्ठतेवर भुजबळ यांनी प्रश्न उभा केल्याने राज्याच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी कडून भुजबळांचे नाव दिले गेले नाही आणि मंत्रिमंडळात कोणाला घ्यावे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असल्याचे सांगून अजित पवार यांनी यावर सर्व चेंडू हा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला.
तर यापूर्वीही विधान परिषदेमध्ये भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांना आमदार बनविण्यात आले आहे. त्यामुळे एका घरात दोन आमदारकी झाली आहे आणि त्यातच मंत्री करणे म्हणजे एक प्रकारे घराणेशहीला खतपणी घालण्यासारखे होते आणि भाजप घराणेशाही विरोधात असल्यामुळे भुजबळांना त्याचाही मोठा फटका बसला.
याशिवाय मराठा आणि ओबीसी राजकारणामध्ये छगन भुजबळ यांनी जो आक्रमकपणा दाखवला तो सरकारला म्हणजेच महायुतीच्या मागील सरकारला शेवटी शेवटी खूपच जड गेलं आणि त्यामुळे जरांगे पाटील यांनी देखील टोकाची भूमिका घेतली होती पण सरकारमधील महायुतीचे नेतृत्व करणारे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यावेळी चे दोन्ही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्या बाबत सरकारची कोणतीही भूमिका स्पष्ट न करता शांत राहणं पसंत केलं आणि अशा पद्धतीप्रमाणे जरंगे पाटलांचा विरोध हा शांत केला पण भुजबळ यांनी घेतलेला आक्रमक पाऊल हे सरकारला धोक्याचं होतं त्यामुळेच भुजबळांना यावेळी त्याचा फटका सहन करावा लागला.
पण याचा पक्षीय स्तरावर विचार केला तर आज ओबीसी घटकांसाठी काम करणाऱ्या मंत्र्यांमध्ये किंवा नेत्यांमध्ये भाजपाला पंकजा मुंडे यांच्या रूपाने खंबीर नेतृत्व मिळाला आहे आणि अशा असताना भुजबळ यांना पुन्हा पुढे यांना हे अवघड होतं म्हणूनच एक प्रकारे भुजबळांना बाजूला सारण्याचा प्रकार या निमित्ताने केला गेला आहे जेणेकरून येणाऱ्या काळात भाजपा आणि ओबीसी अशी प्रतिमा निर्माण व्हावी याची बीजे या निमित्ताने रोवली गेली आहेत. असे मत जिल्ह्यातील राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत.