नाशिक - दप्तर तपासणी करून देण्यासाठी आणि निलंबित कर्मचाऱ्यांचे निलंबन रिपोर्ट क्लियर करण्यासाठी म्हणून आठ हजार रुपयाची लाच घेताना नांदगाव पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडीमध्ये अटक करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा परिषदेमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार येथील तक्रारदार यांच्या टेबलची तपासणी होणार होती की तपासणी व्यवस्थित व चांगल्या पद्धतीने करून देण्याचा अहवाल देण्यासाठी म्हणून तीन हजार रुपये आणि त्यांच्या कार्यालयातील निलंबित कर्मचारी जमदाडे यांची नासिक येथील कार्यालयात सुरू असलेली चौकशी रिपोर्ट क्लियर करण्यासाठी म्हणून पाच हजार रुपये असे एकूण आठ हजार रुपयाची लाच मागण्यात आली होती त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलीस उपाधीक्षक एकनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुनील पवार, संदीप वनवे, योगेश साळवे, यांनी नांदगाव पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी प्रमोद रंगनाथ नवले सध्या राहणार महाजनवाडा मुक्ताईनगर मालेगाव रोड नांदगाव यांना आठ हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले असून त्याबाबतचा भ्रष्टाचार अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . या कारवाईमुळे नासिक जिल्हा परिषदेमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. आपला यशस्वी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वलावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.