अहमदाबाद : गुजरातच्या मेहसाणा इथं आरोग्य कर्मचाऱ्यांनी टार्गेट पूर्ण करण्यासाठी अविवाहित तरुणांची नसबंदी केल्याची धक्कादायक घटना घडलीय. तसंच तरुणांना नसबंदीबाबत कल्पनाही दिली गेली नाही. त्यांना दारुचं आमिष दाखवून रुग्णालयात नेण्यात आलं आणि नसबंदी करून पुन्हा सोडलं. आता या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , मेहसाना जिल्ह्यातल्या नवी शेढवी गावातल्या ३० वर्षीय अविवाहित गोविंद दंतानीने सांगितलं की, त्याच्याकडे एक मल्टिपर्पज हेल्थ वर्कर आला. तेव्हा मी शेतात काम करत होतो. आरोग्य कर्मचाऱ्याने शेतीकामाचं आमिष दाखवलं. माजी सरपंच प्रल्हाद ठाकूर यांनी या प्रकऱणी धक्कादायक खुलासा केला.
त्यांनी म्हटलं की, दोन दिवसांपूर्वी एक आरोग्य कर्मचारी शेतात गोविंदकडे आला. त्याने गोविंदला लिंबू आणि पेरू तोडण्यासाठी दररोज ५०० रुपये मिळतील असं सांगितलं. गोविंद आपल्याला काम मिळणार यामुळे आनंदी झाला.
आरोग्य कर्मचाऱ्याने गोविंदला कारमधून नेलं. वाटेतच १०० रुपयांची दारू पाजली. यानंतर गोविंद नशेत होता. तिथून त्याला सरकारी रुग्णवाहिकेतून गांधीनगर जवळ असलेल्या अदलज इथल्या रुग्णालयात नेण्यात आलं. सरकारी रुग्णालयात गोविंदवर बेशुद्धावस्थेत नसबंदी केली गेली. पुढच्या दिवशी आरोग्य कर्मचाऱ्यांनीच त्याला पुन्हा शेतात सोडलं. गोविंदला त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचं दुसऱ्या दिवशी समजलं. त्याला त्याची नसबंदी केल्याची माहितीच नव्हती. डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्याची तपासणी केली तेव्हा ही बाब उघडकीस आली.
गोविंदने म्हटलं की, मला पेरू आणि लिंबू तोडण्याचं काम मिळेल असं सांगितलं होतं. त्यानंतर एक सरकारी गाडी आली आणि मला दुसऱ्या गावी नेलं. तिथं दारू प्यायला दिली. त्यानंतर जोरागन गावात एका ठिकाणी जाण्याच्या बहाण्याने आणखी दारू दिली. यानंतर मी बेशुद्ध पडलो. पुन्हा घरी परतल्यानंतर मला वेदना होऊ लागल्या. डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी नसबंदी झाल्याची माहिती समजली.