जळगाव : घरातील लोखंडी खिडकी तोडून चोरट्याने 33 तोळे सोन्याचे दागिने आणि 2 लाख 60 हजार रुपये रोख अशी एकूण 28 लाख 55 हजार रुपयांची चोरी केल्याची धक्कादायक घटना भुसावळ येथून समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील सोमनाथ नगर, शिवशक्ती कॉलनी येथे राहणाऱ्या अनिल हरी ब-हाटे यांच्या घरात ही चोरी झाली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू करताच, चोरी करणाऱ्याचा शोध घेतला असता चोरी करणारा हा त्यांचाच जावई असल्याचे समोर आले आहे. दरम्यान जावई राजेंद्र शरद झांबरे याला अटक केली.
राजेंद्र झांबरे याने पोलिसांशी संवाद साधत चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून 21 लाख 5 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. त्याने इतर 100 ग्रॅम सोन्याचे दागिने देखील चोरी केल्याचे कबूल केले, ज्याची किंमत 7 लाख 50 हजार रुपये होती. या प्रकरणात अधिक तपास सुरू असून, पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू ठेवली आहे.
राजेंद्र झांबरे याच्याकडुन चोरीस गेलेला मालापैकी 23 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 2 लाख 60 हजार रुपये रोख असा एकुण 21 लाख 5 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल काढुन दिला. सदर आरोपीताने गुन्हयातील गेलेल्या मालापैकी इतर 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने 7 लाख 50 हजार रुपये किमतीचे चोरी केल्याचे कबुली दिली आहे.
पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस यावा या करीता दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पो. उपनिरीक्षक मंगेश जाधव, विजय नेरकर, निलेश चौधरी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, सोपान पाटील, प्रशांत परदेशी, भुषण चौधरी, राहुल वानखेडे, योगेश माळी, जावेद शहा यांचे पथक तयार करण्यात आले.