नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शहरात सोनसाखळ्या चोरीचे प्रमाण वाढले असून, वेगवेगळ्या ठिकाणांहून पाच महिलांच्या गळ्यांतील १४ तोळे वजनाचे दागिने जबरीने ओरबाडून नेल्याच्या घटना घडल्या.
चेनस्नॅचिंगचा पहिला प्रकार पंचवटीत घडला. फिर्यादी अश्विनी राहुल सम्राट (रा. आशापुरा सोसायटी, धात्रक फाटा, नाशिक) ही महिला मुलांना शाळेत सोडण्याकरिता जात होती. लोकमान्य हॉस्पिटल ते धात्रक फाटा रस्त्यावर भरकादेवी आईस्क्रीम सर्कलवर स्कूल बसची वाट पाहत होती. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने सम्राट यांच्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाचे व ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, २५ हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, ६० हजार रुपये किमतीचे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, असा ३० हजार रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने खेचून तोडून भरधाव वेगाने पळून गेले, तसेच तेथे असलेल्या विजया भरत गांगुर्डे यांच्या गळ्यातील मंगळसूत्रही अज्ञात चोरट्याने बळजबरीने खेचून चोरून नेले. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकम करीत आहेत.
चेनस्नॅचिंगचा पहिला प्रकार नांदूर लिंक रोड येथे घडला. फिर्यादी रिना अशोक कंगले (रा. सिद्धिविनायक चौक, लिंक रोड, पंचवटी) या नांदूर जत्रा लिंक रोडवर असलेल्या संजीवनी बँक्वेट हॉल येथे लग्नसमारंभासाठी आल्या होत्या. हॉलच्या बाहेरील रोडवर गाडी पार्क करून गाडीतून खाली उतरत असताना पाठीमागून मोटारसायकलीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांपैकी मागे बसलेल्या इसमाने कंगले यांच्या गळ्यातील ४२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे १ लाख २६ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने खेचून मोटारसायकलीने पळून गेले. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक खैरनार करीत आहेत.
चेनस्नॅचिंगचा तिसरा प्रकार दत्त चौकात घडला. फिर्यादी सुनीता राजेंद्र शिंपी (रा. बजरंग चौक, दत्तनगर, नाशिक) ही महिला काल (दि. ४) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मोपेड गाडीने राहत्या घराजवळून जात होत्या. त्यावेळी पाठीमागून अपाची मोटारसायकलीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याजवळ येऊन गाडी थांबविली. त्यावेळी पाठीमागे बसलेल्या अनोळखी इसमाने शिंपी यांच्या गळ्यात असलेली एक तोळा वजनाची ४० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून चोरून नेली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार पवार करीत आहेत.
चेनस्नॅचिंगचा चौथा प्रकार पाथर्डी फाटा येथे घडला. फिर्यादी सरला ईश्वर सोनवणे (रा. वासननगर, पाथर्डी फाटा, नाशिक) ही महिला काल (दि. ४) सकाळी ८ वाजेच्या सुमारास घरासमोर साफसफाई करीत होती. त्यावेळी पाठीमागून मोटारसायकलीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी संगनमत करून सोनवणे यांच्या गळ्यात असलेली ७० हजार रुपये किमतीची अडीच तोळे वजनाची सोन्याची पोत व ५० हजार रुपये किमतीची दीड तोळा वजनाची सोन्याची चेन बळजबरीने खेचून चोरून नेली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनार करीत आहेत.
चेनस्नॅचिंगचा पाचवा प्रकार जेलरोड येथे घडला. फिर्यादी शोभा भगवान पाटील (रा. मराठानगर, जेलरोड, नाशिक) या काल (दि. ४) रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास घराच्या परिसरात असलेल्या स्वाध्याय केंद्रात गेल्या होत्या. तेथील पूजापाठ आटोपून त्या घराकडे पायी येत होत्या. त्यावेळी पाटील यांच्या पाठीमागून दोन अनोळखी इसम दुचाकीवरून आले. त्यापैकी एका इसमाने पाटील यांना विचारले, की वृंदावन सोसायटी कुठे आहे? त्यानंतर पाटील यांनी अशा नावाची कोणतीही सोसायटी नाही.
त्यानंतर ही महिला घराचे गेट उघडून जात असताना दोन अनोळखी इसमांपैकी एकाने पाटील यांच्या गळ्यात असलेली सोन्याची पोत बळजबरीने खेचून चोरून नेली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार टेमगर करीत आहेत.