३० नोव्हेंबर २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- बेलतगव्हाण येथे एका कार्यालयाची तोडफोड करीत सुरक्षारक्षक व इंजिनिअर यांना दमबाजी करीत पाच जणांच्या सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल माजी नगरसेवकाने दरोडा टाकून लुटून नेल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी प्रताप शिवाजी चुंभळे (रा. लेखानगर, सिडको) यांचे बेलतगव्हाण येथे ए ब्लॉक सर्व्हे नंबर २१/२ येथे कार्यालय आहे. आरोपी माजी नगरसेवक पवन पवार, विशाल पवार, रामेश्वर पटेल, युवराज मोरे व नाना पगारे यांच्यासह ५० ते ६० अनोळखी इसम दि. २२ नोव्हेंबर रोजी तेथे आले. त्यांनी लाठ्याकाठ्या व कोयते घेऊन तेथे प्रवेश केला. तेथे असलेल्या सुरक्षारक्षकाने त्यांना हटकले असता त्यांनी हाताच्या चापटीने मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केली व सुरक्षारक्षकास काढून दिले.
त्यानंतर सीसीटीव्ही इंजिनिअर यालाही दम देऊन तेथून हाकलून दिले. त्या ठिकाणी संशयित टोळक्याने तोडफोड करून ऑफिसमधील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली १ लाख ७० हजार रुपयांची रोकड, कपाटात ठेवलेले जागेच्या मिळकतीचे मूळ दस्तऐवज, ३४ हजार २०० रुपये किमतीचा प्लस कंपनीचा डीव्हीआर व सहा सीसीटीव्ही कॅमेरे, १९ हजार ५०० रुपये किमतीची ट्यूबिलर बॅटरी, यूपीएस व २४ हजार रुपये किमतीचा ३२ इंची एलईडी टीव्ही असा २ लाख ४७ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल टोळक्याने दरोडा टाकून जबरीने चोरून नेला.
या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात ५० ते ६० जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक देवरे करीत आहेत.
Copyright ©2024 Bhramar