नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून पक्षात असलेले, मनसेचे विविध पदे भूषविणारे नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक हे आज सायंकाळी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे समजते. ऐन विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात मनसेचा बडा नेता शिवसेना उद्धव ठाकरे गटात जात असल्याने नाशिकमध्ये मनसेला मोठे खिंडार पडल्याचे मानले जात आहे. सायंकाळी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अशोक मुर्तडक यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
अशोक मुर्तडक यांच्या मनसे प्रवेशामुळे नाशिकमधील विधानसभा निवडणुकीची मतांची गणितेदेखील बदलू शकतात विशेषत: मध्य नाशिक व पंचवटी मतदारसंघात याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. ऐन निवडणूक प्रचारकाळात हा सोहळा होत असल्यामुळे मुर्तडक यांच्यासमवेत किती पदाधिकारी व कार्यकर्ते मनसेत जातात, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
तसेच विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेच्या खेळात ‘किंगमेकर’ बनता येईल, इतके उमेदवार सहज निवडून आणू, असा विश्वास काही महिन्यांपूर्वी मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांनी व्यक्त केला होता. या त्यांच्या व्यूहरचनेवरही दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. अशोक मुर्तडक यांच्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेशामुळे नाशिकच्या चारही मतदारसंघांतील मतदानाची गणिते कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.