Nashik : पतीसह सासरच्यांकडून महिला वकीलाचा छळ; कधी पैशांची मागणी तर कधी घराबाहेर काढले
Nashik : पतीसह सासरच्यांकडून महिला वकीलाचा छळ; कधी पैशांची मागणी तर कधी घराबाहेर काढले
img
दैनिक भ्रमर
नाशिक (प्रतिनिधी) :- दुसऱ्या मुलीवर प्रेम असताना केवळ पैशांसाठी एका महिला वकीलाशी लग्न करून तिचा छळ केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पिडीत महिलेने अंबड पोलीस ठाण्यात पती व सासरच्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे. फिर्यादीत पिडीतेने म्हटले आहे की, 7 मे 2023 रोजी त्यांचा संगमनेरमधील एका इसमाशी विवाह झाला होता.

मुलगा एमबीए झालेला असून, तो मुरलीधर बाजीराव ॲण्ड कंपनी या नावाने तांदळाचा होलसेल व्यापार करतो. त्याला व्यवसायातून महिन्याला 3 ते 4 लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचे पिडीत महिलेला लग्नापूर्वी सांगण्यात आले होते. पिडीता ही नाशिकमध्ये वकीलीची प्रॅक्टीस करत होती. लग्नानंतर ती प्रॅक्टीस करू देऊ अशी हमी मुलाकडच्यांनी दिली होती.

लग्नानंतर पिडीतेला पती व सासरच्यांनी काही दिवस चांगली वागणूक दिली. महिना-दीड महिन्यानंतर पती, सासू, दीर, जाव, नणंद यांनी घरातील छोट्या छोट्या गोष्टीवरुन तिच्याशी भांडण केले. पती नंतर तिला अश्लिल भाषेत शिवीगाळ करू लागला. एक दिवस पिडीतेला फिरण्यासाठी तिचा पती शिर्डीला घेऊन गेला. तेथे त्याने त्याची मैत्रीण पुजा हिच्याशी ओळख करून दिली. 

देवदर्शन न करता तो पुन्हा तिला घरी घेऊन आला. आणि म्हणाला माझे पुजासोबत प्रेमसंबंध असून, मी फक्त पैशांसाठी तुझ्याशी लग्न केले आहे. नंतर तिच्या सासरच्यांनी संगमनेर येथे बुक केलेल्या फ्लॅटचे पैसे भरण्यासाठी 10 लाख रुपये घेऊन ये नाही तर तुला नांदवणार नाही, असे सांगितले.

पतीने नंतर गोड बोलून तिच्या अंगावरील स्त्रीधनही काढून घेतले. सणवाराच्या दिवशी घालण्यासाठी तिने ते पुन्हा मागितले असता तुझे सर्व दागिने मी बँकेत गहाण ठेवले आहे. ते तुला आता मिळणार नाही, असे पतीने सांगितले. दिवाळी सणानिमित्त पिडीता तिच्या काकांसमवेत आली होती. तिला पुन्हा घ्यायला येण्यासाठी ती पतीला वारंवार फोन करत होती. मात्र तो फोन घेण्यास टाळत होता आणि घेतलाच तर उडवाउडवीची उत्तरे देत होता. नंतर सासरच्यांनी तिला  फोन करून तू नांदण्यासाठी येऊ नको, आम्हाला पुन्हा फोन करू नको, असे सांगितले.

बदनामी होईल या भितीने शेवटी पिडीता स्वत:च आपल्या सासरी गेली. त्यावेळी तिचा पती, सासू व सासरचे इतर लोक तिच्या अंगावर धाऊन जात तू इथे का आली?, तुला सांगितले होते तु इथे येऊ नको, असे म्हणत तिला शिवीगाळ केली. हे सर्व सहन करत पिडीता तेथेच राहिली. त्यावेळी घरातील लोक तिला मानसिक व शारिरीक छळ करू लागले. घरात ॲक्वा फिल्टर असून, तिला तळमजल्यावर पाणी घेण्यासाठी पाठवत असे. आणि मोलकरीण म्हणून वागणूक देत असे. एक दिवस पिडीतेचा पती फिरायला बाहेरगावी गेला असता तिच्या सासूने रात्री साडेअकरा वाजता शिवीगाळ करुन तिला घराबाहेर काढले.

त्यावेळी तिने सर्व प्रकार मध्यस्थी असलेल्या इसमाला सांगितला असता तु जीव दे नाही तर काही कर असे सांगून तिला हाकलून लावले. या सर्व गोष्टींना कंटाळून अखेर पिडीतेने पोलीस ठाणे गाठत सर्व आपबिती सांगितली. पिडीतेच्या फिर्यादीवरुन अंबड पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group