आज काल गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक असून लूटमार, दरोडे अशा घटना रोजच घडताना दिसत आहेत. कधी कधी इतक्या विकृत घटना घडतात कि त्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते अशीच एक धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात घडली आहे.
दरोडा टाकताना महिलेला मारहाण केल्याचा आणि सोन्याच्या झुब्यासाठी महिलेचा कान कापल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यात घडला आहे. शिरुर तालुक्याच्या पूर्व भागात गुनाट गावात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. कानातील सोन्याचा दागिना चोरी करायला विरोध केला म्हणून दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने या महिलेचा कान कापला आहे, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोपान करपे हे पत्नी सुमन, मुलगा राजेंद्र, सून कल्पना, मुलगा आत्माराम, सून ज्योती आणि नातवंडांसह गुनाट गावातील करपे वस्ती येथे राहतात. शेती हा या कुटुंबाचा व्यवसाय आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की , सोपान करपे आळंदीला पायीवारी करण्यासाठी गेले होते, त्यामुळे 25 नोव्हेंबरला त्यांच्या पत्नी सुमन खोलीमध्ये एकट्याच दरवाजा ओढून झोपल्या होत्या. तसंच शेजारच्या खोलीत दोन मुलं झोपली होती. रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास तोंडाला काळं मास्क लावलेले चार इसम घरात आले आणि त्यांनी सुमन करपे यांच्या तोंडावर पांघरूण घातलं, त्यामुळे त्या खूप घाबरल्या आणि त्यांनी आरडाओरडा करायला सुरूवात केली. यानंतर दरोडा टाकायला आलेल्या एकाने त्यांचं तोंड दाबलं आणि लाथाबुक्क्याने मारहाण केली. दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्याला चाकू लावून सोन्याचं मंगळसूत्र काढून घेतलं.
सुमन करपे यांच्या कानातील सोन्याचे झुबे आणि वेल काढता येत नसल्याने त्यांनी धारदार शस्त्राच्या साहाय्याने दोन्ही कान खालील बाजूने कापून झुबे आणि वेल काढून घेतले. मुलांच्या मोठ्याने ओरडल्याचा आवाज आला, यानंतर सुमन करपे मुलांजवळ जाऊ लागल्या तेव्हा घराला बाहेरून कडी लावली होती. त्यांनी ही कडी काढली त्यानंतर मुलं आणि सुना बाहेर आल्या. त्यानंतर सुमन करपे यांना मुलांनी दवाखान्यात नेलं. या दरोड्यात सोन्याचे मणी मंगळसूत्र, कानातील सोन्याचे झुबे आणि वेल तसंच 500 रुपयांच्या 6 नोटा असा ऐवज लंपास करण्यात आला आहे.
दरम्यान याबाबत सुमन सोपान करपे (वय 48) राहणार गुनाट (करपेवस्ती) यांनी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली, यानंतर 4 अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरी करत आहेत. घटनास्थळी पुण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक शिळीमकर, शिरुरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी भेट दिली.