नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- अल्पवयीन असल्यापासून सज्ञान होईपर्यंत लग्नाचे आमिष दाखवून सलग नऊ वर्षे एका मुलीवर लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देणार्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अल्पवयीन पीडिता मुलगी ही सातपूर परिसरात राहते. आरोपी राहुल रवींद्र खरात (वय 25, रा. अशोकनगर, सातपूर) व पीडित तरुणी हे सातपूर परिसरातील एकाच शाळेत शिकत होते. तिथे त्यांची ओळख झाली, नंतर मैत्री आणि मग प्रेम.
आरोपी राहुलने पीडित अल्पवयीन मुलगी ही सज्ञान होईपर्यंत तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गरोदर झाली. हा प्रकार मार्च 2016 ते मे 2024 यादरम्यान सुरू होता; मात्र पीडित मुलीने आरोपी राहुल खरात याच्याकडे लग्न करण्याची मागणी केली; मात्र आरोपी तरुणाने तिला उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ केली व पीडितेला मारून टाकण्याची धमकी दिली.
एवढेच नव्हे, तर पीडितेला मारहाण करून तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. राहुल हा काहीच नोकरी धंदा करत नाही. पीडित तरुणीच्या आणि राहुलच्या प्रेम प्रकरणाविषयी त्याच्या घरी माहित होते. मात्र, तो काहीच करत नसल्याने त्याच्या घरचे त्याचे लग्न लावण्यास नकार देत होते. त्याने ती गर्भवती झाल्यानंतर तिचे गर्भपातही केले.
अखेर पीडित मुलीने सातपूर पोलीस ठाणे गाठून आरोपी राहुल खरातविरुद्ध बलात्काराची फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भडांगे करीत आहेत.