अतिरिक्त रक्कम वसूल करण्यासाठी तरुणाचे अपहरण करून जिवे मारण्याची धमकी
अतिरिक्त रक्कम वसूल करण्यासाठी तरुणाचे अपहरण करून जिवे मारण्याची धमकी
img
Prashant Nirantar


नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) :- बाकी असलेल्या रकमेपेक्षा अतिरिक्त रक्कम वसूल करण्यासाठी तरुणाचे अपहरण करून त्याला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्याला डांबून ठेवत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी चेतन धनराज बच्छाव (रा. त्रिमूर्ती चौक, सिडको, मूळ रा. धुळे) हा तरुण गेल्या दोन महिन्यांपासून ओरिजन ग्लोबल इन्पेक्स प्रा. लि. या कंपनीसाठी पर्चेस असोसिएट म्हणून काम करतो. या कंपनीचे केरळ येथे वेअर हाऊस असून, गुडगाव येथे ऑफिस आहे. बच्छाव हे दिल्ली, पंजाब, दक्षिण भारत येथून मिळालेल्या ऑर्डरप्रमाणे कंपनीसाठी पूर्ण भारतातील व्यापार्‍यांकडून कांदा, सोयाबीन, बटाटा, लसूण, कडधान्ये व इतर माल विकत घेतात.

विकत घेतलेला माल दिल्ली, पंजाब यापैकी कुठे पाठवायचा याबाबत कंपनीचे सेल्स एम्प्लॉई ठरवितात. सप्टेंबर 2024 मध्ये फिर्यादी बच्छाव यांनी कंपनीसाठी कोपराव कृषी उत्पन्न बाजार समिती येथून पंकज गरुड नावाच्या व्यापार्‍याकडून 12 लाख 90 हजार रुपये किमतीचा 30 टन कांदा विकत घेतला होता. हा कांदा पटियाला येथे पाठविला. त्यावेळी बच्छाव यांनी पंकज गरुड याला कांद्याचे बिल काटापट्टी मागितली असता त्यांनी काटापट्टी दिली; परंतु बिल दिले नाही. त्यामुळे फिर्यादी स्वत: पटियाला येथे गेले.

त्यादरम्यान अचानक कांद्याचे भाव वाढले; परंतु तेथे पाऊस असल्यामुळे कांद्याची गाडी खाली झाली नाही. त्यामुळे फिर्यादी बच्छाव यांनी गाडीतील अर्धा कांदा अमृतसर येथे पाठविला व पंकज गरुड याला 8 लाख 45 हजार रुपये ऑनलाईन दिले. तेव्हा 4 लाख 45 हजार रुपयांची बाकी फिर्यादी बच्छाव यांच्याकडे होते. त्याला सिक्युरिटी म्हणून फिर्यादीच्या वडिलांनी आरोपी गरुड यास 3 लाख 90 हजार रुपये किमतीचे चेक दिले होते.

फिर्यादी हे पटियाला येथून नाशिक येथे आले असता आरोपी पंकज गरुड याने उर्वरित पैशांची मागणी केली. त्यानुसार थोडे थोडे करून 2 लाख रुपये ऑनलाईन दिले व उर्वरित 1 लाख 90 हजार रुपयांपैकी 49 हजार रुपये रोख देण्यासाठी आरोपी गरुड याला त्रिमूर्ती चौक येथे बोलावले. त्यावेळी आरोपी पंकज गरुड, फिर्यादीच्या ओळखीचा आदेश शेख व एक अनोळखी इसम असे तिघे जण त्या ठिकाणी आले, तेव्हा आरोपी पंकज याला 49 हजार रुपये दिले. त्यानंतर फिर्यादी यांना कामाचा बहाणा करून एमएच 48 एसी 1626 या क्रमांकाच्या स्कॉर्पिओ कारमध्ये घेऊन गेले.

दिवसभर आर. टी. ओ. मार्केट, पंजाब नॅशनल बँक, शरणपूर रोड, सिटी सेंटर मॉल येथे सोबत घेऊन फिरले. त्यानंतर सायंकाळी पंकज गरुड, आदेश व एक अनोळखी इसम फिर्यादी बच्छाव यांना अशोका बिझनेस स्कूल परिसरात घेऊन आले असता त्या ठिकाणी आरोपी पंकज याचा भाऊ प्रशांत गरुड हा टोयोटा कारने तेथे आला. बच्छाव यांना कारमध्ये बसविले व चार लाख रुपयांची मागणी केली; परंतु फिर्यादी यांच्याकडे 1 लाख 90 हजार रुपयांची बाकी असल्याने जादा पैसे देण्यास त्यांनी नकार दिला.

त्यानंतर दुसर्‍या गाडीत बसून शिंदे गाव येथे नेले. त्यावेळी दुसरा एक इसम गाडीमध्ये बसलेला होता. त्यानंतर आप्पा नावाच्या इसमाच्या घरी नेऊन तेथे मुक्काम केला. तेव्हापासून 31 ऑटोबरपर्यंत फिर्यादी बच्छाव यांना स्कॉर्पिओ कारमध्ये संगमनेर, कोपरगाव, सिन्नर, शरणपूर रोड या ठिकाणी फिरवीत होते व रात्री शिंदे गावातील गणेश जाधव यांच्या गाळ्यात मुक्कामाला थांबत होते. तेथे हाताच्या चापटीने मारहाण केली. फिर्यादी यांचे अपहरण करून त्यांना डांबून जिवे मारण्याची धमकी देत फिर्यादीकडील मोबाईल बळजबरीने काढून घेतला.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पंकज गरुड, प्रशांत गरुड व इतर दोन अनोळखी इसमांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group