नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- प्रेमसंबंधाच्या माध्यमातून लग्नाचे आमिष दाखवून हॉटेलचा मॅनेजर असलेल्या विवाहित प्रियकराने तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित तरुणी ही 20 वर्षीय असून, ती कुटुंबीयांसह सिडको परिसरात राहते. ऑगस्ट 2024 मध्ये पीडिता अंबड गावातील हॉटेल महाराणा येथे हाऊसकिपिंगचे काम करीत होती. त्याच हॉटेलमध्ये आरोपी भागीनाथ भास्कर लोखंडे (रा. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) हा मॅनेजर म्हणून काम करीत होता. कामाच्या निमित्ताने पीडिता आणि आरोपी लोखंडे यांची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री होऊन त्यांचे प्रेमसंबंध जुळले.त्यादरम्यान लोखंडे याने पीडितेला लग्नाचे वचन दिले होते. लग्नाचे वचन देऊन दोघांनी लग्न करण्याचे ठरविले; परंतु याबाबत दोघांनीही आपापल्या घरी ही बाब सांगितली नाही. दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पीडितेला आरोपी भागीनाथ लोखंडे याने लेखानगरकडे जाणार्या रस्त्याकडे असलेल्या हॉटेल मॅजेस्टिक येथे नेऊन पीडिेतेच्या संमतीशिवाय तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. याबाबत कोणाला सांगू नकोस, असा दमही दिला.
त्यानंतर पुन्हा सात-आठ दिवसांनंतर सिडकोतील एका हॉटेलमध्ये बोलावून तेथे पीडितेवर अत्याचार केले. त्यानंतर पुन्हा पुन्हा आरोपी लोखंडे हा पीडितेवर लैंगिक अत्याचार करीत होता. दि. 20 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री आरोपीने पीडितेला पाथर्डी फाटा येथील हॉटेल सेलिब्रेशन येथे बोलावून घेतले. पीडिता ही घरात आईला न सांगता हॉटेलवर गेली. तेथे आरोपीने आपण उद्या पुणे येथे जाऊन कोर्ट मॅरेज करू, असे सांगून तिच्याशी पुन्हा शारीरिक संबंध केले. दुसर्या दिवशी सकाळी 9 वाजेच्या सुमारास आरोपी भागीनाथ व पीडिता मोटारसायकलीने पुणे येथे गेले. तेथे त्याचा मित्र राहत असलेल्या दिवेगाव पुणे येथील हॉटेल अगत्य लॉजवर राहिले. तेथेही लग्नाचे आमिष दाखवून पुन्हा अत्याचार केले. त्यानंतर भांडगाव, सासवड, पुणे येथे दोघे जण राहिले.
त्यावेळीही आरोपीने पीडितेसोबत जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी पीडितेला समजले, की आरोपी भागीनाथ याचे पहिले लग्न झाले असून, त्याला तीन मुले आहेत. त्यानंतर पीडितेने तिच्या आईला व मामांना फोन करून पुणे येथे बोलावून घेतले व झालेल्या प्रकाराची माहिती दिली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आरोपी भागीनाथ लोखंडेविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.