२९ ऑक्टोबर २०२४
नाशिकरोड (चंद्रकांत बर्वे) :- नाशिकरोडच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्टेट बँकेच्या ऋग्वेद शाखेतून 25 लाख रुपयांची धाडसी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्याने खिडकीचा गज कापून बँकेत प्रवेश केला आणि कॅशिअरने चुकून ठेवलेली रक्कम चोरून नेली.
याबाबत उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी बँकेचे कामकाज आटोपल्यानंतर स्ट्राँग रूम बंद करण्यात आली होती; परंतु कॅशिअरने पाचशे रुपयांचे पाच बंडल चुकून स्ट्राँग रूमच्या बाहेरील लोखंडी कपाटात ठेवले. शनिवारी आणि रविवारी बँक बंद असल्याने सोमवारी अधिकारी व कर्मचारी बँकेत आले, तेव्हा लोखंडी कपाट व एका खिडकीचा गज तुटलेला आढळला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अनोळखी व्यक्ती खिडकीचा गज तोडून बँकेत प्रवेश करताना दिसली आहे. चोरी झालेल्या रकमेची मोजणी करताना 25 लाखांची कमतरता लक्षात आल्यावर स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक सुरेश दत्तात्रेय बोऱ्हाडे यांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत. घटनास्थळाच्या सर्व बाबींचा अभ्यास केला जात आहे. या चोरीच्या घटनेने बँक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Copyright ©2024 Bhramar