नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- विवाहित तरुणीचा सासरी छळ होत असल्याचा फायदा घेऊन लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याची घटना सिडको परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, 28 वर्षीय पिडीत तरुणी हिचे लग्न झाल्यानंतर नवरा व तिच्यात नेहमी भांडणे व्हायची. त्यावेळी पिडीत तरुणी एका ठिकाणी शिक्षण घेऊन नोकरी करत होती. शिक्षण घेत असलेल्या ठिकाणी तिची ओळख आरोपी सुहास सुदामराव वाकडे याच्याशी झाली. नंतर मैत्री वाढत गेल्याने तिला सासरी होत असलेल्या त्रासाविषयी ती नेहमी त्याला सांगायची.
त्याने तिला घटस्फोट घेण्याचा सल्ला देऊन आपण लग्न करू असे आश्वासन दिले. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर ती काही काळ त्याच्यासोबत लिव्हईन रिलेशन शिपमध्ये राहिली. त्यावेळी त्याने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यातून ती गर्भवती झाल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडले.
हा सर्व प्रकार एप्रिल 2021 ते सप्टेंबर 2024 या काळात पाथर्डी शिवारात घडला. पिडीतेने लग्नाचा तगादा लावल्यानंतर त्याने तिला नकार दिला. व झालेल्या घटनेविषयी कोणाला काही सांगितले तर तुझे फोटो व व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकी सुहास वाकडे याने पिडीतेला दिली.
याप्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ करत आहेत.