स्वतःच्याच वडिलांवर चाकूने वार करत मुलाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूर्व दिल्लीच्या मधू विहार भागामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मुलाने केलेल्या हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या वडिलांना एलबीएस रुग्णालयात दाखल असून वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. या मुलाचं नाव सचिन असून तो 33 वर्षांचा आहे.
हल्ला झालेल्या व्यक्तीचं नाव वेद प्रकाश शर्मा असून ते 62 वर्षांचे आहेत हे समोर आलं. मुलाने आपल्यावर जीवघेणा हल्ला केल्याचं वेद प्रकाश शर्मा यांनी जखमी अवस्थेमध्येच पोलिसांना सांगितलं. यानंतर पोलिसांनी मुलाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 9 नोव्हेंबरला पोलीस कंट्रोल रूमला सूचना मिळाली, ज्यात मधू विहार भागात एका युवकाने आपल्या वडिलांवर चाकूने हल्ला केल्याचं सांगण्यात आलं. यानंतर लगेचच पोलीस घटनास्थळी रवाना झाले. मधू विहारच्या वेस्ट विनोद नगर भागात एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर हा प्रकार घडला. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा संपूर्ण घरात रक्त सांडलं होतं.
दरम्यान , पोलिसांनाआरोपी मुलगा घराजवळच सापडला. आपले आणि वडिलांचे चांगले संबंध नसल्याचं मुलाने पोलिसांना सांगितलं. आईच्या मृत्यूनंतर हे संबंध आणखी खराब झाले, 9 नोव्हेंबरला आमच्यामध्ये क्षुल्लक कारणावरून वाद सुरू झाला. वडिलांच्या बोलण्यामुळे नाराज होऊन मी भाजी चिरण्याच्या चाकूने त्यांच्यावर वार केला, असं मुलाने पोलीस तपासात कबूल केलं आहे. पोलिसांनी हा चाकू घरातून जप्त केला आहे.