राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रचार सभा सुरु असून नेत्यांचे अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा सुरु असून पंतप्रधान मोदी यांची आज अकोले येथे सभा झाली. या सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी महाविकस आघाडीवर हल्लाबोल करत काँग्रेसवर एक गंभीर आरोप केला. महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसने 700 कोटींची वसुली केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
“महायुतीच्या या घोषणापत्रादरम्यान महाआघाडीच घोटाळापत्र आलय. देशाला माहितीय महाआघाडी म्हणजे भ्रष्टाचार, महाआघाडी म्हणजे हजारो कोटींचे घोटाळे, महाआघाडी म्हणजे पैसा काढणं, महाआघाडी म्हणजे टोकन मनी. महाआघाडी म्हणजे ट्रान्सफर पोस्टिंगचा धंदा” असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
“महाआघाडीचे घटक काँग्रेसच एक उदहारण देतो. काँग्रेसच जिथे सरकार येतं, ते राज्य शाही कुटुंबाच ATM बनतं. सध्या हिमाचल, तेलंगण आणि कर्नाटक ही राज्य काँग्रेसच्या शाही कुटुंबाच ATM बनली आहेत. लोक सांगतायत सध्या महाराष्ट्रातील निवडणुकीच्या नावावर कर्नाटकमध्ये वसुली डबल झालीय. निवडणूक महाराष्ट्रात वसुली डबल झाली कर्नाटक, तेलंगणमध्ये” असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
तसेच , “कर्नाटकात या लोकांनी मद्य दुकानदारांकडून 700 कोटी रुपयांची वसुली केलीय. तुम्ही कल्पना करु शकत नाही, काँग्रेस पार्टी घोटाळे करुन निवडणूक लढत आहे. ते निवडणूक जिंकल्यानंतर किती घोटाळे करतील? आपल्याला महाराष्ट्रात सावधान रहायचं आहे. महाराष्ट्राला महाआघाडीच्या महाघोटाळ्याच ATM बनू देऊ नका” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
दरम्यान, “महायुती सरकारची पुढची पाच वर्ष कशी असतील, याची एक झलक महायुतीच्या वचननाम्यात दिसतेय. महिला सुरक्षा, महिलांना संधी, माझी लाडकी बहिण योजनेचा विस्तार. युवा वर्गासाठी लाखो रोजगार. विकासाच्या योजना. महायुती सरकार महाराष्ट्राच्या विकासाला डबल स्पीडने पुढे नेईल. युवा शिक्षा, रोजगार महायुतीच सरकार करील स्वप्न साकार” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी अकोले येथील प्रचार सभेत बोलले.