चंद्रपूर : चंद्रपुरातील कुख्यात गुंड हाजी सरवर याच्या हत्याप्रकरणातील १४ आरोपींवर चंद्रपूर पोलिसांनी 'मोक्का' अंतर्गत कारवाई केली आहे. या वर्षातील जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे. या प्रकरणातील १३ आरोपी हे वेगवेगळ्या कारागृहात असून एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , प्रमोद मधुकर वेळोकर, ऊर्फ राजू भगवान वेरूळकर ऊर्फ समीर शेख सरवर (वय ४२) रा. दिग्रस जि. यवतमाळ, नीलेश ऊर्फ पिंटू नामदेवराव ढगे (३६) रा. नंदनवन, नागपूर, श्रीकांत अशोक कदम (३२) रा. दिग्रस जि. यवतमाळ, प्रशांत ऊर्फ परसी राजेंद्र मालवेनी (२७) रा. नकोडा, घुग्घुस, राजेश रमेश मुलकलवार (२५) रा. नकोडा, घुग्घुस, सुरेंद्रकुमार रामपती यादव (३६) रा. नंदनवन नागपूर, अक्षय मारोती रत्ने (२८) रा. नाकोडा घुग्घुस, मोहसिन नसीर शेख (३५) रा. जलनगर चंद्रपूर, अभिजित ऊर्फ पवन मोरेश्वर कटारे (३५) रा. जलनगर, चंद्रपूर, शेख नसिफ शेख रशीद (३३) रा. जलनगर, चंद्रपूर, अखिल जमिल कुरेशी (३६) रा. रहमतनगर चंद्रपूर, नूर अहमद अब्दुल वहाब कुरेशी (३६) रा. रहमतनगर, सय्यद अबरार इंतसार अहमद (३९) रा. घुग्घुस, तर फरार आरोपी किशोर चानोरे, रा. किष्णानगर नंदनवन नागपूर असे मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या आरोपींची नाव आहेत.
चंद्रपुरातील कुख्यात गुंड शेख हाजी बाबा शेख सरवर याची १२ ऑगस्ट रोजी हत्या केली होती. चंद्रपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना आरोपींवर कलम १०३ (१), १०९ (१), १८९ (२), १८९ (४), १९१ (२), १९१ (३), १९० भारतीय न्याय संहिताअन्वये गुन्हा दाखल करून १४ पैकी १३ आरोपींना अटक केली होती. या प्रकरणाचा तपास करताना उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांनी १४ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ अन्वये कारवाई करण्याकरिता पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्यामार्फत नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला होता. मंजुरी मिळाल्यानंतर मोका लावण्यात आला. या प्रकरणाचा तपास आता अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू करणार आहेत.
एका आरोपीचा पोलिसांना गुंगारा
हाजी सरवरच्या हत्याप्रकरणात १४ जणांचा समावेश असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. चौदाही आरोपींवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तत्परता दाखवत पोलिसांनी लगेच १३ आरोपींना अटक केली असली तरीही या प्रकरणातील चौदावा आरोपी किशोर चानोरे हा अद्यापही फरार आहे.