नवी मुंबई : तरुणीच्या इशाऱ्यावर तिच्यासोबत लॉजवर गेलेल्या तरुणाला लुटल्याची घटना एपीएमसी परिसरात घडली. याप्रकरणी एपीएमसी पोलिस अधिक तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं?
एका तरुणीने पेढा देऊन तरुणाला बेशुद्ध केले आणि त्यानंतर त्याच्याकडील ऐवज लुटून तेथून धूम ठोकली. दुसऱ्या दिवशी सकाळी तरुणाला जाग आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. जुहूगाव परिसरात राहणाऱ्या वीस वर्षीय तरुणासोबत एका तरुणीने फेसबुक मैत्री केली. त्यातून या तरुणीने त्याला एपीएमसी येथील एका लॉजवर बोलवले. तिच्या निमंत्रणाला भुलून हा तरुण त्याठिकाणी गेला. लॉजमधील खोलीत गेल्यावर या तरुणीने त्याला पेढा खायला दिला. तो खाताच काही वेळातच तो बेशुद्ध पडला. सकाळी जाग आल्यानंतर तरुणाला अंगावरील दोन सोन्याच्या चेन व दोन मोबाइल लंपास झाल्याचे लक्षात आले. त्यावरून आपण ‘हनी ट्रॅप’चा शिकार होऊन लुटलो गेल्याचे तरुणाच्या लक्षात आले.
याप्रकरणी त्याने एपीएमसी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरून तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या गुन्ह्यात तिच्यासह इतरांचाही समावेश असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्यावरून पोलिस या टोळीचा छडा लावण्यासाठी सखोल तपास करत आहेत.