जालना : जालन्यात तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबत मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील महाकाळा येथील ही घटना आहे. शनिवारी या शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दत्ता शेळके (वय 36 वर्षे) असं या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी जालन्यातील गोंदी पोलिस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील महाकाळा येथे दत्ता शेळके हा तरुण शेतकरी आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. या शेतकऱ्याने शेतीसाठी कर्ज घेतले होते. पण शेतीतून चांगले उत्पन्न येत नव्हते आणि घरची जबाबदारी यामुळे हा शेतकरी चिंतेत होता. या शेतकऱ्याने शनिवारी आपल्या राहत्या घरी लोखंडी पाईपला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
दत्ता शेळके या शेतकऱ्याच्या आत्महत्येचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवला आहे. कर्जबाजारीपणामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच्या निधनामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास आता गोंदी पोलिस करत आहे.