बारामती तालुक्यातील होळ येथील पीयुष विजय भंडलकर या 9 वर्षीय बालकाचा त्याच्याच वडिलांनी रागाच्या भरात भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून खून केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , 14 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता राहत्या घरी ही घटना घडल्याची माहिती आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार दडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी या खुनाचं रहस्य उलघडवत वडील विजय गणेश भंडलकर, मृत पीयुषची आजी शालन गणेश भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
वडील विजय भंडलकर यांनी मुलगा पीयुष याला तू अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो, तू तुझ्या आईच्या वळणावर जावून माझी इज्जत घालवणारा दिसतोय, असे म्हणत त्याला हाताने मारहाण केली. राग अनावर झाला अन् त्यांनी त्याचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपटले यात त्याचा मृत्य झाला. पीयुष याची आजी हे सर्व पाहत होती. पण तिने मुलगा विजयला अडवलं नाही. त्यानंतर विजय याच्या सांगण्याप्रमाणे पीयुष हा चक्कर येवून पडला आहे, अशी खोटी माहितीही तिने दिली.
संतोष भंडलकर याने डाॅ. भट्टड यांच्या दवाखान्यात पीयुषला नेल्यानंतर तेथे विजय याच्या सांगण्यावरून पीयुष हा चक्कर येवून पडल्याची खोटी माहिती दिली. डॉक्टरांनी पीयुष याला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून जाण्याचा सल्ला दिला.
मात्र तेथे न नेता आणि मृताबाबत गावातील पोलीस पाटील अथवा इतर कोणालाही काहीही सांगितलं नाही. त्याने नातेवाईकांना बोलावून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृत मुलाचे शवविच्छेदन न करता थेट अत्यंविधीची तयारी केली. पोलिसांना खबऱ्याकडून ही माहिती समजताच पोलिसांनी अंत्यविधी थांबवत पीयुष याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामतीला नेला आणि त्यानंतर तपासात बापानेच पीयुषची हत्या केल्याचं समोर आलं आहे.