कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. इथे बुधवारी दुपारी झालेल्या एका अपघातात एका महिलेसह तिच्या ३ वर्षांच्या लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. शाळा सुटल्यानंतर आई आपल्या मुलाला घेऊन परत येत होती, तेव्हा महानगरपालिकेच्या ट्रकने त्यांना चिरडलं आहे. शाळेतून परत येत असताना अशाप्रकारे मायलेकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार , निशा सोमेस्कर आणि अंश सोमेस्कर असं मृत पावलेल्या मायलेकाचं नाव आहे. घटनेच्या दिवशी बुधवारी सकाळी निशा यांनी आपल्या ३ वर्षीय मुलाला शाळेत सोडलं होतं. त्याची शाळा सुटल्यानंतर त्या मुलाला आणायलाही गेल्या. पण परत येताना दोन्ही मायलेकावर नियतीनं झडप मारली. दोघंही रस्ता ओलांडण्यासाठी कल्याणमधील लाल चौकी परिसरातील एका डिव्हायडर जवळ थांबले होते. दरम्यान वेगात आलेल्या महानगर पालिकेच्या डंपरने दोघांना चिरडलं.
अपघाताची ही घटना घडताच स्थानिकांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केलं. पण याचा काहीच फायदा झाला नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केलं. मृत निशा सोमेस्कर यांचे पती अमित हे बंगळुरू येथील एका आयटी कंपनीत नोकरीला आहेत. अपघाताच्या एक दिवस आधीच ते बंगळुरूला रवाना झाले होते. ते बंगळुरूला जाताच मागे अशाप्रकारे अपघात झाल्याचं मृताच्या नातेवाईकांनी सांगितलं.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित आणि निशा यांच्या लग्नाला १५ वर्षाहून अधिकचा काळ लोटला आहे. अनेक वर्षे त्यांना मूलबाळ होत नव्हतं. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या घरी अंशचा जन्म झाला होता. त्यामुळे सगळं कुटुंब आनंदी होतं. पण त्यांचा आनंद अवघ्या तीनच वर्षात विरला. बुधवारी झालेल्या अपघातात अंशसह त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे.
शाळेतून परतत असताना मायलेकाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी डम्पर चालकाला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.