नाशिक : गुजरात सीमेवरून महाराष्ट्रामध्ये मध्यरात्रीच्या अंधारात पेठ तालुक्यातून बेकायदेशीररित्या गुटखा व सुगंधी तंबाखू आणली जात असल्याची घटना समोर आली आहे. अन्न व औषध पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यरात्री छापा टाकून ही कारवाई केली आहे. याबाबत पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासन नाशिक, यांनी गुटखा व प्रतिबंधीत पदार्थाविरुध्द मोहीम सुरु केलेली असून त्याचाच भाग म्हणून या कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी जिल्हयातील सिमावर्ती भागातील पेठ तालुक्यामध्ये पाळत ठेवली व पोलीसांशी संपर्क साधला असता दिनांक एक जानेवारी रोजी पहाटे ३.०० वा. कोटंबी घाटात वाहन क्र. MH-१४ KA २१८५ हे वाहन संशयास्पद स्थितीत असल्याने पेठ पोलीसांनी थांबवले असता या वाहनात इतर मालासमवेत काही तंबाखूच्या गोण्या आढळून आल्याने त्यांनी हे वाहन पेठ पोलीस स्टेशन येथे आणले.
त्याठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी देशमुख यांनी तंबाखूच्या साठ्याची पाहणी केली असता सदर साठा हा सुंगधीत तंबाखूचा असल्याचे स्पष्ट झाल्याने देशमुख यांनी वाहनातील हजर व्यक्तीची चौकशी केली त्यांनी आपले नाव जसप्रीत सिंह सरदार वजीर सिंह, एलनाबाद, जि. सिरसा, हरियाणा असे सांगितले.
त्यानंतर या व्यक्तीकडून देशमुख यांनी पाहणी केली असता त्यामध्ये सुंगधीत तबांखूच्या १३ गोण्या व ५०० ग्रॅम वजनाचे ८० पाकीटे असे एकूण किंमत रु. ४लाख ८७ हजार ५०० इतका रुपयांचा साठा असल्याचे आढळले.
त्या साठ्यातून देशमुख सुंगधीत तंबाखूचे २ नमुने घेऊन व शिल्लक साठा वाहनासह एकूण किंमत रु. १५ लाख ८४ हजार ७५० इतका ताब्यात घेतला. त्यानंतर देशमुख या साठयाचे मालक उत्पादक व पुरवठादार यांच्या बाबत चौकशी साठी पेठ पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुध्द भारतीय न्याय संहितेचे कलम १२३, २२३, २७४ व २७५ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आले.
हि कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी , नाशिक विभागाचे सह आयुक्त, (अन्न) . म. ना. चौधरी, सहाय्यक आयुक्त (अन्न), विवेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली केली .