आजकाल गुन्हेगारीच्या प्रमाणातचिंताजनक वाढ झाली असून सर्रासपणे गुन्हे केले जातात. विकृत मानसिकतेतून हत्ये सारखे मोठे गुन्हे सर्रास पणे केले जातात. अशीच एक धकाकदायक घटना उघडकीस आली आहे. सालगड्याने सोन्याच्या लोभासाठी मालकाची निघृण हत्या केल्याची थरारक घटना घडली आहे.
मालकाचं अपहरण करून त्याची हत्या केली आणि मृतदेहाचे अनेक तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरमध्ये घडला आहे. सालगड्याने सोन्याच्या लोभासाठी ही हत्या केली आहे. सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील यल्लमवाडी गावात हा प्रकार घडला आहे. मालक कृष्णा नारायण चामे यांची डोक्यात हातोडा घालून हत्या करण्यात आली, त्यानंतर त्यांच्या शरिराचे तुकडे करून शेतातील शौचालयाच्या खड्ड्यात पुरण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी सालगडी सचिन गिरी याला अटक केली आहे, तसंच मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 डिसेंबर पासून कृष्णा चामे यांचं अपहरण झाल्याची तक्रार मोहोळ पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. सालगडी सचिन गिरी यांच्याकडूनच ही तक्रार करण्यात आली होती. अज्ञात पाच ते सहा व्यक्तींनी मालक कृष्णा चामे यांना मोटरसायकलवर बसून अपहरण करून गेल्याची तक्रार सालगड्याने दिली.
सदर शेतामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्यामुळे पोलिसांना अनेक अडचणी आल्या, त्यामुळे तपास पुढे जाऊ शकत नव्हता. पोलिसांनी वेगवेगळ्या युक्ती लावून तपास सुरू केला. पण अपहरणाच्या पाच दिवसानंतर सालगडी सचिन गिरी याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याच्या बोलण्यात विसंगती दिसून आली. सचिन गिरी याला ताब्यात घेऊन पोलिसांनी सखोल चौकशी केली असताना त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गिरी याने चामे यांचा आर्थिक आणि सोन्याच्या लोभासाठी हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार , कृष्णा चामे यांची डोक्यात हातोडा घालून हत्या करण्यात आली, त्यानंतर धारदार शस्त्राने त्यांच्या शरिराचे तुकडे करून वेगवेगळ्या पॉलीकॅप कॅरीबॅग मध्ये भरून शेतातील शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरण्यात आले. त्यानंतर कृष्णा चामे यांच्या अंगावरील 18 ते 19 तोळे सोने घेतलं गेलं, त्यात अंगठ्या, लॉकेट आणि सोन्याच्या कड्यांचा समावेश होता. सदरचे दागिने घरासमोर पुरल्याचे कबुली ही सचिन गिरी यांनी दिली. सचिन गिरी यांनी कृष्णा चामे यांची हत्या एकट्यानेच केल्याची कबुली दिली आहे, मात्र त्यात इतरही सह आरोपी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे, त्यामुळे पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत.