52 किलो सोनं, 235 किलो चांदी! नोटांवर टाकायचा..; RTO हवालदाराकडे घबाड
52 किलो सोनं, 235 किलो चांदी! नोटांवर टाकायचा..; RTO हवालदाराकडे घबाड
img
Dipali Ghadwaje
मध्य प्रदेशमधील भोपाळच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील माजी हवालदाराच्या संपत्तीवर मिळालेल्या बेहिशोबी मालमत्तेसंदर्भात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

आता प्रकरणामध्ये सापडलेल्या नोटांचे बंडल आणि सोनं आणि चांदीच्या साठ्यासंदर्भातही आश्चर्यचकित करणारी माहिती  उघड झाली आहे.

आरोपी सौरभ शर्माने घरामध्ये एवढ्या मोठ्याप्रमाणात वेगवेगळ्या माध्यमातून संपत्ती का गोळा केलेली याबद्दलची रंजक माहिती तपास यंत्रणांना दिली आहे.

बेहिशेबी संपत्तीमध्ये साठवलेल्या नोटांना वाळवी लागू नये म्हणून सौरभ शर्मा या नोटांवर रसायन शिंपडायचा. सौरभ शर्माचा मित्र चेतन याच्या मालकीच्या ठिकाणावर अंमलबजावणी संचालनालयाला म्हणजेच ईडीने केलेल्या छापेमारीमध्ये 1 कोटी 72 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.

या सर्व नोटांवर रसायन शिंपडल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांना दिसून आलं. आरोपी सौरभ हा नोटांची संख्या ठराविक मर्यादेपेक्षा अधिक वाढल्यावर त्या पैशांमधून सोनं-चांदी विकत घ्यायचा.

सौरभचा मित्र चेतन सिंह गौरच्या वेगवेगळ्या संपत्तींवर केलेल्या छापेमारीमध्ये 1.72 कोटी रुपये आढळून आले. या नोटा अडीच लाख रुपयांचे बंडल तयार करुन ठेवण्यात आले होते. या नोटांना वाळवी लागू नये म्हणून त्यावर बोरिक पावडर टाकून ठेवण्यात आलेली. काही पाकिटांवर 2022 असं लिहिलेलं आढून आलं. मागील दोन वर्षांमध्ये सौरभ आणि त्याच्या मित्रांनी ही बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सौरभ शर्मा कॅश स्वरुपातील नोटा वाळवीपासून वाचवण्यासाठी सोन्या-चांदीच्या विटा खरेदी करायचा. सौरभ आणि त्याचा मित्र चेतन यांनी घरात तयार केलेल्या गुप्त लॉकरमध्ये 235 किलो चांदीच्या विटा ठेवल्या होता. ईडीने या प्रकरणात तपास सुरु केला आहे. या छापेमारीमध्ये सापडलेल्या सर्व गोष्टींचा मूळ स्रोत आम्ही शोधत असून त्याचा अभ्यास करत असल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

आयकर विभागाला दिलेल्या जबाबामध्ये चेतन गौरने स्वत:ला सौरभ शर्मासाठी काम करणारा सर्वसामान्य कर्मचारी असल्याचं सांगितलं आहे. सौरभ जिथे सांगायचा तिथे मी स्वाक्षरी करायचो, असा दावा चेतनने केला आहे. माझ्याकडून तो वेगवेगळी कारणं सांगून कागदपत्रं तयार करुन घ्यायचा, असा दावाही चेतनने केला आहे.

मी आधीपासून सौरभला ओळखत होतो असंही तो म्हणाला. आपल्याला कामाची गरज होती त्यामुळेच आपण सौरभला फार प्रश्न विचारायचो नाही असं म्हटलं आहे. 

ईडीच्या छापेमारीमध्ये सौरभकडे 7.98 कोटींची बेहिशेबी मालमत्ता नोटा आणि सोन्याचांदीच्या स्वरुपात सापडली आहे. यापैकी 2.87 कोटी रुपये कॅश तर उर्वरित संपत्ती 54 किलो सोनं आणि 235 किलो चांदीच्या माध्यमात आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group