वणी, चांदवड परिसरात दोन कारसह 15 लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त
वणी, चांदवड परिसरात दोन कारसह 15 लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- थर्टीफर्स्टच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण पोलीस सतर्क झाले असून, वणी व चांदवड येथे अवैध मद्यवाहतूक करणार्‍या दोन कारसह एकूण 15 लाखांचा अवैध मद्यसाठा नाशिक ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे.

ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, नाशिकचे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी अवैध मद्यवाहतूक रोखण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

याअंतर्गत पहिल्या घटनेत कसबे वणी गावातील केआरटी कॉलेजसमोर ह्युंडाई ईऑन कारमधून देशी मद्याचा 1 लाख 68 हजार 700 रुपये किमतीचा मद्यसाठा नेला जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून संबंधित कार अडवून कारसह एकूण 3 लाख 18 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला, तसेच साईनाथ भारत जाधव (रा. वागळूद, ता. दिंडोरी) या कारचालकास ताब्यात घेण्यात आले. हा मद्यसाठा किरण नागरे (रा. रामवाडी, नाशिक) यांच्या दुकानातून भरून आल्याचे उघडकीस आल्याने या दोन्ही इसमांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच दुसर्‍या घटनेत चांदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणूर रोडवरील आशिष वाईन शॉप येथे अवैध मद्यवाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती. त्यानुसार चांदवड ते देवळा रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचला असता एका एर्टिगा कारमधून 21 हजार रुपये किमतीचा मद्यसाठा, तीन मोबाईल फोन व कार असा 10 लाख 31 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी सागर रमेश कोतवाल (वय 30) आणि प्रसाद किशोर सोनवणे (वय 24, दोघेही रा. चांदवड) यांच्याविरुद्ध विनापरवाना मद्यवाहतूक केल्याबद्दल चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या यशस्वी मोहिमेबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, कळवण विभागाचे उपविभागीय अधिकारी किरण सूर्यवंशी व मनमाडचे बाजीराव महाजन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुदाम मुंगसे, हवालदार किशोर खराटे, सचिन देसले, प्रवीण गांगुर्डे, पोलीस नाईक नितीन डावखर, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, कॉन्स्टेबल सागर खाडे, प्रवीण पवार, पुरुषोत्तम वाटाणे, सुनील गांगोडे, किशोर बोडके, ज्ञानेश्‍वर गांगुर्डे व चालक हेमंत वाघ यांच्या पथकाचे अभिनंदन केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group