पुणे: पुण्यामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) या प्रकरणी कारवाई करत 18 मुलींची सुटका केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , पुण्यातील बाणेर आणि विमानतळ परिसरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. यातून आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पुण्यातील उच्चभ्रू भागांत चालणाऱ्या बेकायदेशीर स्पा सेंटरवर पुणे पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत 18 पीडित मुलींची सुटका केली आहे. या प्रकरणात एकूण 10 हून अधिक परदेशी मुलींचा समावेश आहे.
विमानतळ पोलिसांनी स्थानिक माहितीच्या आधारे एका स्पा सेंटरवर छापा टाकत मुलींची सुटका केली. या महिलांमध्ये 10 परदेशी नागरिकांचा समावेश असून, उर्वरित 6 भारतीय आहेत.
प्राथमिक चौकशीत संबंधित स्पा सेंटरमध्ये देह व्यापार चालत असल्याची खात्री झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी स्पा सेंटरचा मालक, व्यवस्थापक आणि जागा भाड्याने देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे.
दुसऱ्या कारवाईत बाणेरमधील एका उच्चभ्रू स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकून दोन मुलींची सुटका केली. या ठिकाणीही मसाजच्या नावाखाली देह व्यापार सुरु असल्याचे उघड झाले असून ग्राहकांकडून मोठ्या रकमांची वसुली करून अवैध व्यवसाय केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आर्थिक व्यवहारांपासून ते परदेशी महिलांची भारतातील एन्ट्री कशी झाली, यासंबंधी सखोल चौकशी केली जात आहे.
पोलिस सूत्रांनी सांगितले की या रॅकेटमागे असलेल्या सूत्रधारांचा शोध घेतला जात आहे आणि या प्रकारच्या बेकायदेशीर स्पा सेंटरवर सातत्याने कारवाई सुरूच राहणार आहे.