उत्तर प्रदेशातील वाढती गुन्हेगारी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील थाना नाकुर भागातील दल्लेवाला गावात 15 वर्षीय प्रिन्सच्या हत्येचा गुंता पोलिसांनी 24 तासांत उलगडला. पोलिस, सर्व्हेलन्स टीम आणि स्वाट टीम यांनी संयुक्त कारवाईत आरोपी अक्षयला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रिन्सचे त्याच्याच गावातील एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते, इंस्टाग्राम आणि मोबाईलद्वारे त्यांचा संवाद सुरू होता, नातं होतं. आणि ती मुलगी आरोपीचीच बहीण होती. आरोपी अक्षयला जेव्हा त्या दोघांच्या अफेअरबद्दल कळलं तेव्हा त्याने प्रिन्सला अनेकवेळा भेटून त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण प्रिन्सने काही त्याचं ऐकंल नाही. त्याचं त्या मुलीशी अफेर सुरूच होतं. अखेर अक्षयने प्रिन्सचा काटा काढण्याचं ठरवलं आणि सुनियोजित पद्धतीने हत्या करण्याचं ठरवलं.
अशी केली हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, 7 जुलै रोजी संध्याकाळी आरोपीने प्रिन्सला पार्टीच्या बहाण्याने गावाबाहेरील एका शेतात बोलावले. तेव्हाच आरोपी अक्षय हा त्याच्या घरातून चाकूही सोबत घेऊन गेला होता. शेतात त्या दोघांमध्ये वाद झाला आणि प्रिन्सने मोबाईल शेतात फेकून दिला. याचा अक्षयला राग आला आणि त्याने त्याच रागाच्या भरात प्निन्सच्या मानेवर अनेक वार करून त्याची हत्या केली. हत्येच्या या गुन्ह्यानंतर आरोपी अक्षय हा जंगलातून वाट काढत बांधकाम सुरू असलेल्या महामार्गावर पोहोचला आणि एका ट्यूबवेलजवळील वाळूमध्ये चाकू लपवून तिथून पळून गेला.
8 जुलै रोजी पोलिसांना शेतात मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली, त्यानंतर तपास सुरू झाला. मृताची ओळख प्रिन्स कश्यप अशी झाली. तर मृत्यूचे कारण चाकूने गळा चिरून हत्या केल्याचे असल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले. तपास सुरू केल्यानंतर पोलिसांनी कॉल डिटेल्स तपासले असता अक्षयचे नाव समोर आले, त्याला पोलिसांनी 9 जुलैच्या रात्री सहसपूरजवळील बांधकाम सुरू असलेल्या पुलाखाली अटक केली.
चौकशीदरम्यान, आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आणि सांगितले की त्याला त्याच्या बहिणीच्या बदनामीची भीती होती, ज्यामुळे त्याला खून करण्यास भाग पाडले गेले. अटक होताच, तो पोलिसांची माफी मागत राहिला आणि त्याने चूक केल्याचे सांगत राहिला. आरोपी आणि मृतक एकमेकांना ओळखत होते आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये चांगले संबंध होते. परंतु मृतक आणि त्याच्या बहिणीमधील वाढत्या जवळीकतेमुळे आरोपी संतापला होता. पोलिसांनी संपूर्ण प्रकरण उलगडलं असून आरोपीला तुरुंगात पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.