गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढले आहे. ज्यामध्ये बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राजकीय संबंधांमुळे प्रचंड गाजलं होतं. त्यानंतर आता अशीच निर्घृण हत्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे एका माजी सरपंचाची झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे वंजारी समाजाचे माजी सरपंच अशोक सोनुने यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
पोलीस स्टेशनमधून त्यांचं अपहरण झालं. त्यानंतर महिनाभर ते गायब होते. त्यानंतर आता लोणार पोलीस स्टेशनच्या एक किलोमीटरच्या अंतरावर त्यांची मुंडकं नसलेली बॉडी सापडली आहे.
दरम्यान त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याच्या एका वर्षात आठ तक्रारी दिल्या होत्या. त्यामुळे ते मिसिंग झाल्यानंतर पीडित कुटुंब तीन वेळा पोलीस स्टेशनला गेलं होतं. त्यांनी आरोप केल्यापैकी एक आरोपी गेल्या महिन्याभरापासून फरार आहे. किरकोळ जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
याबाबत ऑल इंडिया पँथर सेनेचे नेते दीपक केदार यांनी एक सोशल मीडिया साइटवर पोस्ट करत माहिती दिली.
त्यांनी म्हटले आहे की, या घटनेवर विधानभवनात कोण बोलणार? गरीब वंजारी समाजाचा कुणीच वाली नाही. पोलीस अधीक्षकांनी तात्काळ या प्रकरणात गांभीर्याने चौकशी करावी. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी याची दखल घेत त्यामध्ये आणि सीआयडीमार्फत चौकशी करावी. त्याचबरोबर वंजारी समाजाचे नेते भाऊ-बहीणसुद्धा यामध्ये भूमिका घेतील आणि या कुटुंबाला साथ देतील अशी अपेक्षा.