सावंतवाडी-माठेवाडा येथील प्रिया पराग चव्हाण या विवाहितेने काही दिवसांपूर्वी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर प्रिया चव्हाणच्या वडिलांनी सावंतवाडी पोलिसांत देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने आणि त्यांचे पती मिलिंद माने यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
माने यांच्यावर प्रिया हीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणाने सावंतवाडी परिसरात खळबळ उडाली.
या प्रकरणानंतर परिसरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने आणि त्यांचे पती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. वैभव नाईक यांच्या दबावानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. कारवाई सुरु असताना प्रणाली माने यांनी अंतरिम अटकपूर्ण जामीन मिळवला.
त्यानंतर मिलिंद माने यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. पण चौकशी आधीच त्यांची प्रकृती बिघडली. तब्येत बरी नसल्याने मिलिंद माने यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.
प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलीस वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला. त्यांच्या नेतृत्त्वाखाली ठाकरे गटाने सावंतवाडी पोलीस ठाण्यात धडक दिली.
प्रिया चव्हाणला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना लढा देणार असल्याचे वक्तव्य माजी आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.