घरात वंशा ला दिवा मिळावा आणि पुन्हा मुलगी जन्माला येऊ नये म्हणून एका सासूने आपल्या सुनेला भयन्कर वागणूक दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुन्हा मुलगी जन्माला येऊ नये म्हणून एका सासूने सूनेचं बळजबरीनं गर्भपात केलं आहे. सध्या सूनेची तब्येत बिकट असून, सूनेला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आरोपी महिलेसह पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशच्या भदोहीमधून ही घटना उघडकीस आली आहे.
पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१७ साली लग्न झाल्यापासून, तिचा पती आणि सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ केला जात होता. पीडित महिलेवर सातत्यानं अत्याचार सुरू होता. तसेच सूनेवर माहेरीहून एक लाख रूपये आणण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. पण सासरच्यांकडून तिचा खरा छळ सूनेनं दोन मुलींना जन्म दिल्यानंतर सुरू झाला. सासरच्या लोकांनी तिला रोज त्रास देण्यास सुरूवात केली.
दरम्यान, पीडित तरूणी तिसऱ्यांदा गरोदर राहिली. यानंतर सासूनं तिसरी मुलगी नको, गर्भपात कर असं सासूनं सुनेला बळजबरी केली. मात्र पीडित सुनेला हे अमान्य होतं. सासूनं सुनेला जबरदस्तीने गोळ्या खाऊ घातल्या, ज्यामुळे तिचा गर्भपात झाला. त्यानंतर पीडितेवर पुन्हा हुंड्यासाठी दबाव टाकण्यात आला आणि २१ मार्च २०२४ रोजी सुनेला दोन मुलींसह घरातून बाहेर काढण्यात आलं.सुनेनं थेट आपलं माहेर गाठलं. तेथे कुटुंबीयांच्या मदतीनं तिने १३ एप्रिल २०२४ रोजी कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर कारवाई करत न्यायालयानं १७ डिसेंबरला पोलिसांना सासू, पती तसेच इतर ४ नातेवाईक आरोपींविरूद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.