राज्यात महिलासुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेवर विश्वास ठेवणे कठीण आहे. महिलेवर सासऱ्याने बलात्कार केल्याची संतापजनक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. विवाहित महिलेवर तिच्या सासऱ्याने तिच्या नवऱ्याच्या सहमतीने बलात्कार केला. इतकेच नाही तर आरोपींनी महिलेला वेश्या व्यवसाय करण्यासही भाग पाडले. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहर हादरले. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‘माझ्यावर झालेल्या अन्याय विरोधात मला शासनाने तात्काळ न्याय मिळवून देऊन दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.’, अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकदा नाही तर आरोपी वारंवार महिलेवर बलात्कार करत असल्याचे उघड झाले आहे. तसेच, महिलेवर तिच्या सासऱ्याने नवऱ्यासमोरच बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या घटनेतील नराधम नवरा आणि सासरा एवढेच करून थांबले नाही तर त्यांनी पीडित विवाहित महिलेची डेटिंग ॲपवर बनावट प्रोफाइल तयार करून तिला वेगवेगळ्या पुरुषांसोबत वेश्या व्यवसाय करण्यासही भाग पाडले. दरम्यान, महिलेने देहविक्रीचा व्यवसाय करण्यास नकार दिल्यानंतर तिला तिचा नवरा आणि सासर्याने अमानुषपणे मारहाण केली.
तसेच, विवाहित महिलेने या त्रासाला कंटाळून पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली, तर तिला तिच्या सासूने मुलांसोबत घराबाहेर काढले त्यामुळे महिला आता बेघर झाली आहे. या प्रकरणात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून भोसरी पोलिस ठाण्यामध्ये तिचा नवरा आणि सासऱ्याविरोधात बलात्काराचा आणि बळजबरी देहविक्रीचा व्यवसाय करवून घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.