नाशिक पुन्हा हादरले; पंचवटीत टोळक्याकडून युवकाचा खून
नाशिक पुन्हा हादरले; पंचवटीत टोळक्याकडून युवकाचा खून
img
Dipali Ghadwaje
पंचवटी : (भ्रमर प्रतिनिधी) :- आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विडी कामगारनगरमध्ये काल रात्री सव्वादहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास एका युवकाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरण पसरले आहे. विशांत भोये (वय 24, रा. विडी कामगारनगर, अमृतधाम, पंचवटी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की विशांत भोये हा आपल्या कुटुंबासमवेत अमृतधाम विडी कामगारनगर येथे वास्तव्यास आहे. दोन दिवसांपूर्वी त्याच परिसरातील काही मुलांसमवेत त्याचे वाद झाले होते. रात्री सव्वादहा ते साडेदहाच्या सुमारास विडी कामगारनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ तो आपल्या मित्रांसमवेत गप्पा मारत उभा होता. यावेळी त्या ठिकाणी अचानक काही महिला आल्या आणि त्यांनी विशांत व त्याच्या समवेत उभ्या असलेल्या मित्रांच्या डोळ्यात प्रथम मिरची पूड फेकली.

त्यानंतर सात जणांच्या टोळक्याने विशांतवर हल्ला केला. यातील एका संशयिताने विशांतच्या छातीवर चाकूने वार केला. यावेळी विशांत रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. विशांतला त्याच्या मित्रांनी लागलीच उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र त्याच्या छातीवर वर्मी घाव लागल्याने डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दोन दिवसांपूर्वी लहान मुलांच्या किरकोळ कारणावरून किरकोळ वाद झाला होता, त्यातून हा खून झाल्याचे समजते.

याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासासाठी पथके रवाना केली. पोलिसांनी आतापर्यंत दोन जणांना ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध सुरू आहे.

खुनाच्या घटनेनंतर अमृतधाम कामगार परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस असल्याने छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मयत विशांत भोये याच्या नातेवाईकांनी खासगी रुग्णालयाबाहेर प्रथम मारेकर्‍यांना जेरबंद करा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी मागणी केली. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group