नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- पहिल्या पत्नीशी फारकत न घेता दुसऱ्या पत्नीशी लग्न करून तिची फसवणूक करणाऱ्या चार पुरुषांसह दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला ही आडगाव परिसरात राहते. या महिलेला आरोपी पतीने त्याचे पहिले लग्न झाल्याचे लपवून व पहिल्या पत्नीशी फारकत न घेता पीडितेसोबत दुसरे लग्न केले, तसेच ही विवाहिता मध्य प्रदेशातील रतलाम येथील सासरी राहत होती.
दि. 6 जुलै 2022 ते दि. 14 मार्च 2024 या कालावधीत पतीसह सासू, सासरे, नणंद व मामेसासरे यांनी संगनमत करून विवाहितेला वाईटसाईट शिवीगाळ करून मारहाण व दमदाटी करून विवाहितेचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ केला, तसेच तिच्या अंगावरील स्त्रीधन विश्वास संपादन करून काढून घेत त्याचा अपहार केला.
वारंवार होणाऱ्या या छळाला कंटाळून अखेर विवाहितेने आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बस्ते करीत आहेत.