कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी पोलिसांना मिळाली आहे. मध्यरात्री पोलिसांना कल्याण पोलीस स्टेशन उडवून देणार असल्याचा फोन आल्याने एकच धावपळ सुरू झाली.
रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानक तपासले मात्र बॉम्ब कुठे न मिळून आल्यानंतर ही अफवा असल्याचे सिद्ध झाले. अखेर याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , मंगळवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी गणेश सर्जेराव मोरे हे कर्तव्यावर होते. त्यावेळी पोलीस ठाण्याचा फोन खणखणला. मोरे यांनी फोन उचलल्यावर समोरच्या व्यक्तीने मी दिल्लीवरून बोलतोय, असे म्हणत एका व्यक्तीचा नंबर सांगितला. या व्यक्तीने कल्याण रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवला असल्याचे त्यांने सांगितले. तसेच कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देणार असल्याचेही सांगितले.
त्यानंतर तात्काळ मध्यवर्ती पोलिसांनी ही माहिती ठाणे कंट्रोल रूम आणि कल्याण रेल्वे पोलिसांना दिली. कल्याण रेल्वे पोलिसांनी तात्काळ बॉम्ब शोध पथक आणि डॉग स्क्वाडच्या माध्यमातून पूर्ण रेल्वे स्थानक पिंजून काढले. तब्बल तीन ते चार तास झालेल्या सर्च ऑपरेशन नंतर बॉम्बची अफवा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर तात्काळ मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी वरिष्ठांच्या मान्यतेने बॉम्बच्या अफवेचा फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.