उंटवाडीजवळ डोक्यात दगड टाकून सराईताची हत्या
उंटवाडीजवळ डोक्यात दगड टाकून सराईताची हत्या
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नव्या वर्षाच्या स्वागताची धामधूम सुरू असताना शहरातील उंटवाडी रोडवरील क्रांतीनगर भागात एका सराईत गुन्हेगाराचा त्याच्याच सराईत गुन्हेगार मित्रांनीच डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली. लक्ष्मण गारे (वय 34, रा.क्रांतीनगर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतल्याचे समजते.

काल (दि. 31) रात्री उशिरापर्यंत थर्टीफर्स्ट व नव्या वर्षाच्या स्वागताची धामधूम सुरू असताना घडलेल्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. उंटवाडी रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात मद्यप्राशन करण्यासाठी आलेल्या तिघांपैकी दोघांनी कुरापत काढून लक्ष्मणच्या डोक्यात दगड टाकला.

लक्ष्मण हा घरी असताना रात्री दहा वाजेच्या सुमारास संशयित गणेश नितीन भावसार व रिजवान काजी (दोघे रा. क्रांतीनगर) यांनी त्याला सोबत नेले. ’थर्टी फर्स्ट’ची पार्टी करू, असे सांगून त्याला घेऊन ते आले. पूर्ववैमनस्यातून लक्ष्मणसोबत त्यांनी वाद घातला. शिवीगाळ करत संशयितानी त्याच्या डोक्यात दगड टाकला. यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यानंतर दोघेही हल्लेखोर दुचाकीने फरारी झाले. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मृत युवकाच्या नातेवाईक, मित्रपरिवाराने गर्दी केली होती. भावसार व काजी हे दोघेही पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार आहेत, त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही मारहाण व दुखापतीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group