नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- 32 वर्षीय महिलेसोबत प्रेमाचे खोटे नाटक करून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करून पीडितेच्या पाच वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी ही उपनगर परिसरात राहते. आरोपी पुरुष हा पीडित महिलेचा ओळखीचा मित्र आहे. त्यांची कामाच्या निमित्ताने ओळख झाली होती. नंतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले. पीडिता हिचा यापूर्वी विवाह झाला होता. तिची फारकत साठी कोर्टात केस सुरु असताना तिची या युवकासमवेत ओळख झाली.
आरोपीने पीडितेशी ओळख वाढवून तिच्यासोबत प्रेमाचे खोटे नाटक केले, तसेच लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर टाकळी रोड व नाशिकरोड येथे बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर पीडितेची पाच वर्षीय मुलगी हिला वाईट हेतूने नको त्या ठिकाणी वेळोवेळी स्पर्श करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार दि. 3 एप्रिल ते 28 डिसेंबरदरम्यान पीडितेच्या घरी घडला.
प्रेम प्रकरण सुरु झाल्यानंतर त्याने लग्न करण्याचे सांगत मुलीला पण सांभाळेल असे तिला सांगितले. तिने लग्नासाठी तगादा लावल्यानंतर तो निघून गेला होता. त्या मुलाचे दुसऱ्या मुली सोबत लग्न ठरत असल्याची माहिती तिला मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे समजताच तिने पोलीस ठाणे गाठले.
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध बलात्कारासह विनयभंग व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.