नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- टायपिंगच्या परीक्षेसाठी डमी परीक्षार्थीला सहकार्य करून परीक्षा मंडळाची दिशाभूल करणार्या टायपिंग इन्स्टिट्यूटच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी जालिंदर रामचंद्र झनकर (रा. श्रद्धा अपार्टमेंट, रामवाडी, पंचवटी) हे गंगापूर रोडवरील प्रमोद पटेल ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य आहेत. या कॉलेजमध्ये दि. 21 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत मराठी टंकलेखन परीक्षा प्रतिमिनिट 30 शब्द (जीसीसी-टीबीसी) आयोजित करण्यात आली होती. या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी विकास अशोक शिखरे (रा. मु. पो. ता. खानापूर) याने त्याच्या जागेवर कोणी तरी तोतया इसमाला परीक्षा देण्यासाठी पाठविले.
त्यासाठी सानिका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक राजेश पंढरीनाथ सायंकर यांनी डमी परीक्षार्थीला सहाय्य करून परीक्षा मंडळाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. ही बाब फिर्यादी प्राचार्य जालिंदर झनकर यांच्या लक्षात आली.
त्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात परीक्षार्थी विकास शिक्रे, टायपिंग इन्स्टिट्यूटचे संचालक राजेश सायंकर व डमी विद्यार्थी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.