मित्र म्हंटले की एकत्र पार्ट्या मजा मस्ती हे सर्वच आली. आता नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन साठी तर आता पासूनच सुरुवात झाली आहे. अनेक मित्र मस्त प्लॅन करून एकत्र पार्ट्या करत असतात आणि मस्त एन्जॉय करतात. मजा मस्करी करतात. अशीच एक पार्टी आणि त्यातून केलेली मस्करी एका तरुणांच्या जीवावर बेतली आहे. दारू पार्टीचे घरी सांगितल्याचा रागातून मित्रांनी आपल्याच मित्राला संपवलं असल्याचे समोर आले आहे.
चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील तरुणांनी एकत्र येत दारूची पार्टी केली. पार्टी केल्याची गोष्ट त्यातीलच एकाने मित्रांच्या घरी सांगितल्याचा राग मनात ठेवत 4 ते 5 जणांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत डोक्यात लाकडी दांडक्यांनी जोरात दणके देण्यात आले. यात जखमी झालेल्या दादा बारकू ठाकूर या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दादा ठाकूर आणि काहीजणांनी 2-4 दिवसांपूर्वी पार्टी केली. मात्र दादा ठाकूर यानेच काहींच्या घरी पार्टी केल्याची माहिती दिली, असा संशय आल्याने 4 ते 5 जणांनी मिळून गावात दादा ठाकूर यास मारहाण केली. मारहाणीत त्याच्या डोक्यात लाकडी दांडके टाकल्याने तो जबर जखमी झाला. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.