नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वच जण उत्सुक असून राज्यात जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. नवीन वर्षाच्या पार्श्ववभूमीवर महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आज रात्री मुंबई लोकलकडून विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे आज मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
तसेच , कल्याणमध्ये आज पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. या पार्श्वभूमीवर 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 83 अधिकारी, 532 अंमलदार तैनात असणार आहेत. त्यासोबत 17 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच 27 बीट मार्शल पेट्रोलिंग, 20 मोबाईल पेट्रोलिंग ही असणार आहे. तसेच प्रतिबंधक, छेडछाडविरोधी, बार चेकिंग, तपास आणि गोपनीय पथकं अशी विशेष पथके कार्यरत असणार आहेत. तसेच 8 ब्रेथ एनालायझर, 10 नाकाबंदी ठिकाणांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
तसेच , पुण्यात सरत्या वर्षाला निरोपाच्या पार्टीवर नियंत्रण घालण्यासाठी 3000 पोलिस तैनात करण्यात आले आहेत. यामुळे दारू पिऊन गोंधळ घातल्यास कारवाई होणार आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर रोजी पुणे पोलिसांनी चांगलीच खबरदारी घेतली आहे. त्या अनुषंगाने सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासोबतच पुणे शहरात ३ हजारांवर पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. त्यासोबत ८०० वाहतूक पोलिस कर्मचारी चौका-चौकांमध्ये तैनात असणार आहेत. पुणे शहरात प्रामुख्याने २७ महत्त्वांच्या ठिकाणांवर ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई केली जाणार आहे.