आजकल सोशल मीडियावर रील्स बनविण्याचा छंद हा लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींमध्येही पाहायला मिळतो. त्यात आपला व्हिडिओला जास्तीत जास्त विव्ह्ज मिळावे म्हणून अनेक प्रकारचे प्रयत्न केले जातात. काही लोक यासाठी तर वाट्टेल ते करायला तयार असतात. काही वेळा तर हे वेड त्यांचा जीवावर बेतलेले पाहायला मिळाले तर कधी या लोकांचं हे व्हिडिओ बनविण्याचं वेड बाकीचांसाठी मात्र डोकेदुखी च कारण बनत. दरम्यान आता अशीच एक घटना आता उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीने इन्स्टाग्रामवर असा व्हिडिओ टाकला, की ज्यामुळे अर्धा तासात तिच्या घरी पोलीस गेले.
सोळा वर्षीय मुलीनं शुक्रवारी (27 डिसेंबर) कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला. याबाबत पोलीस महासंचालक ऑफिसमध्ये असलेल्या सोशल मीडिया सेंटरवरून स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर अर्ध्या तासातच पोलीस संबंधित मुलीच्या घरी पोहोचले. उत्तर प्रदेश राज्यातल्या गोरखपूरमधल्या कॅम्पियरगंज भागात हा प्रकार घडलाय.
शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मेटा कंपनीच्या ई-मेलद्वारे पोलीस महासंचालक ऑफिसमध्ये असणाऱ्या सोशल मीडिया सेंटरला एका आक्षेपार्ह व्हिडिओबाबत अलर्ट मिळाला. त्यानंतर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर हा व्हिडिओ शेअर करणारी मुलगी कॅम्पियरगंज भागात असल्यानं त्याबाबत कॅम्पियरगंज पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी संबंधित मुलीच्या मोबाइल लोकेशनवरून तिच्या घराचा पत्ता मिळवला.
पोलिसांनी संबंधित मुलीचं घर गाठलं. तेव्हा मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या कुटुंबासमोर पोलिसांनी तिच्याशी संवाद साधला. त्यावेळी मुलीनं सांगितलं की, ‘मी रिकाम्या कीटकनाशकाच्या बाटलीत पाणी टाकून ते पाणी पिण्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. माझी पोस्ट जास्तीत जास्त व्हायरल व्हावी, यासाठी मी हे केलं होतं.’ त्यानंतर पोलिसांनी तिची चूक लक्षात तिच्या आणून देताच तिने पोस्ट डिलीट केली. तसंच पोलिसांनी संबंधित मुलीचं समुपदेशन करून भविष्यात अशी चूक न करण्याबाबत तिला सांगितलं. समुपदेशनानंतर मुलीनं भविष्यात अशी चूक न करण्याचं आश्वासन पोलिसांना दिलं.
संबंधित अल्पवयीन मुलीचं रील्सचं वेड तिच्या कुटुंबासह पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरलं. या व्हिडिओनं अनेकांची झोपच उडाली होती. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर जपून करावा.