नव वर्षाच्या सुरुवातीच्या आधी अनेक लोक फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात परंतु अशातच आता पयर्टनच्या ठिकाणी विशेषतः पाण्यातील बोटिंग करणे आता प्रवाशांना धोकादायक ठरले आहे.
काही दिवसांआधी मुंबईमध्ये नीलकमल ही प्रवासी बोट बुडाली होती, ज्यात 15 जणांना जीव गमवावा लागला होता. तर अनेक प्रवासी जखमी झाले होते
ही घटना ताजी असतानाच आता गोव्यामध्येही बोटीचा अपघात झाला आहे. उत्तर गोव्याच्या कलंगुट्टे बिचवर ही बोट पलटली आहे, ज्यात एका प्रवाशचा मृत्यू झाला आहे तर 20 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. बुधवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. मृत्यू झालेल्या माणसाचं वय 54 वर्ष होतं.
तर अपघातात जखमी झालेल्या 20 जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.जखमी झालेल्या 20 प्रवाशांमध्ये 6 आणि 7 वर्षांची दोन मुलं आहेत. तर 25 आणि 55 वर्षांच्या दोन महिला आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार बोटीतून जाणाऱ्या 2 प्रवाशांशिवाय इतर सर्व प्रवाशांनी लाईफ जॅकेट घातली होती. बोटीतल्या प्रवाशांमध्ये 6 वर्षांच्या लहान मुलांपासून ते महिलाही होत्या, असं दृष्टी मरीनच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. समुद्र किनाऱ्यापासून 60 मीटर अंतरावर ही बोट पलटली आहे. या बोटीमध्ये महाराष्ट्रातल्या खेडचे 13 प्रवासी होते. बोट समुद्रात पलटी होत असल्याचं दिसताच दृष्टी मरीनचे प्रतिनिधी तात्काळ दाखल झाले आणि त्यांरेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. दृष्टी मरीनच्या 18 जीव रक्षकांनी बोटीवर अडकलेल्या प्रवाशांचे प्राण वाचवले आणि त्यांना समुद्र किनाऱ्यावर सुरक्षित आणलं. यानंतर जखमींना लगेचच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.