राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून महायुती मंत्रिमंडळाचे खातेवाटप नुकतेच पार पडले आहे. त्यानंतर राजकारणातील घडामोडींना वेग आला असून आता पालकमंत्री पदावरून राजकारणात मोठ्या हालचालीना सुरुवात झाली आहे. बीडचे नवे पालकमंत्री कोण असणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
खाते वाटपानंतर आता सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे पालकमंत्रिपदाच्या वाटपाकडे, महायुतीमध्ये अनेक जागांवर पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच असल्याचं दिसून येत आहे. गेल्यावेळी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. यावेळीही त्यांनाच पालकमंत्रिपद मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता, बीडचं पालकमंत्री पद कोणाला द्यायचं यासंदर्भात मी अजितदादा आणि एकनाथ शिंदे मिळून ठरवू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच बीडमध्ये कोणाचीही दादगिरी आम्ही चालू देणार नाही असा इशाराही यावेळी फडणवीस यांनी दिला आहे.
ड्रमायन, सध्या बीड जिल्हा सर्वाधिक चर्चेमध्ये आहे, काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. यावरून सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. यातील काही आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाहीये. आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल असं अश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. दरम्यान त्यानंतर आता बीडचे नवे पालकमंत्री कोण असणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.