बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण राजकरण हादरले. दरम्यान, आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोग गावात जाऊन देशमुख यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. संतोष देशमुख यांचा आज तेराव्याचा दिवस होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोग गावात जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन देऊन अजितदादा गावातून निघाले.यावेळी गावकऱ्यांनी अजितदादांना घेरलं. ‘अख्खा बीड जिल्हा नासवला, धनंजय मुंडेंला मंत्रिमंडळातून काढा’ अशी मागणीच गावकऱ्यांनी केली.
“धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका, ओ दादा, धनंजय मुंडेंला मंत्रिपद देऊ नका. त्याला कोणतंही पद देऊ नका. दादा, जनतेचं म्हणणं ऐकून घ्या, त्याच्या एकट्यामुळे सगळे मयत झाले आहे. हे सगळे कुत्रे आहे. धनंजय मुंडेंनी लय पक्षपात केला आहे, त्याने बीड जिल्हा नासवून टाकला आहे, त्या मंत्रिपद देऊ नका’ अशी गावकऱ्यांनी अजितदादांकडे मागणी केली.
तसंच “अजितदादा काहीच बोलले नाही. साधं बोलले, सारवासारव केली आणि निघून गेले. गावातील लोकांची कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. संतोष देशमुख यांच्या हत्येला १३ दिवस झाले आहे. अजून ४ माणसं फरार आहे. पण अजूनही एकही माणूस पकडला नाही. आमचं काही ऐकून घ्यायचं नाही तर मग नागपूरमधूनच बोलायचं असतं. अजितदादांनी जे आश्वासन दिलं ते अजिबात मान्य नाही. वाल्मिक कराडला अटक करा, असं यायचं सांगून जायचं फक्त हे आम्हाला पटलं नाही’ असा रागही गावकऱ्यांनी व्यक्त केला.