राज्यातील महायुतीच्या मंत्रिमंडळचा विस्तार झाला असून एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली, ज्यामध्ये 33 कॅबिनेट मंत्र्यांचा तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी इच्छा महायुतीमधील अनेक आमदारांची होती. मात्र मंत्रिपद न मिळाल्यानं सध्या महायुतीमधील अनेक नेते नाराज असल्याचं चित्र आहे. यांनतर मात्र राजकारणातील घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळतेय.
छगन भुजबळ यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागू शकली नाही. त्यानंतर छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले, छगन भुजबळ पुन्हा एकदा अॅक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे, त्यांनी कांद्याच्या प्रश्नासाठी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं आहे. राज्यात कांद्यावर लावण्यात आलेलं 20 टक्के निर्यात शुल्क माफ करावं अशी मागणी भुजबळ यांनी या पत्राद्वारे केली आहे.
लाल कांद्याच्या दारात घसरण होत असून, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याने त्याचे 20 टक्के निर्यात शुल्क माफ करावे, अशी मागणी भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. तर राज्यातील कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क माफ करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.