राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. परंतु या नंतर महायुतीतील वर्तुळातील घडामोडींना वेग आला आहे . या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून अनेक दिग्दज नेत्यांना मात्र डच्चू देण्यात आला आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे तेही नाराज असल्याचे समजतेय.
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ओबीसी समाजात अस्वस्थता आहे. भुजबळ यांनीही आपली नाराजी दूर करून पक्षनेतृत्वाला खडे सवाल विचारले आहेत. ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनीही भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने महायुतीला लक्ष्य केले आहे. तसेच भुजबळ यांच्या मंत्रिपदावरून सुरू असलेल्या वादाला वडेट्टीवारांनी फोडणी दिली.
ओबीसी म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला, हे अगदी खरे आहे. ओबीसींची मते घेतली, पण सरकार येताच ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला. एकप्रकारे त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर अन्याय केला आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीला लक्ष्य केले. छगन भुजबळ नवा पर्याय शोधत आहेत. त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. ते निर्णय काय घेतात यावर ओबीसी समाज आपला निर्णय ठरवेल. भुजबळ यांनी भूमिका घेताना पद आणि सत्तेसाठी घेऊ नये. त्यांनी ओबीसी हिताची आणि ओबीसी लढ्याला पुढे न्यायची भूमिका घ्यावी. त्यांना आम्ही जरूर साथ देऊ, असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले.