मविप्रच्या माजी विद्यार्थ्याने रचला इतिहास; ४४ दिवस १७ तासांत पूर्ण केले ४ हजार ११२ कि.मी. अंतर
मविप्रच्या माजी विद्यार्थ्याने रचला इतिहास; ४४ दिवस १७ तासांत पूर्ण केले ४ हजार ११२ कि.मी. अंतर
img
दैनिक भ्रमर
नाशिक : येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचा माजी विद्यार्थी आणि निफाड तालुक्यातील तामसवाडीतील शेतकऱ्याच्या मुलाने अवघ्या ४४ दिवसांत काश्मिर ते कन्याकुमारी हे ४ हजार ११२ कि.मी. अंतर धावत पूर्ण केले. त्याने दि. ११ नोव्हेंबरला सुरु केलेली ही मोहीम २६ डिसेंबर रोजी फत्ते करून जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली असून, यानिमित्ताने नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर तर झळकलेच शिवाय मविप्रच्या शिरपेचातही मानाचा तुरा खोवला गेला आहे. याबद्दल मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाने कौतुक केले आहे.

कु. वैभव वाल्मिक शिंदे (वय २६) असे या युवकाचे नाव असून, निफाड तालुक्यातील तामसवाडी हे त्याचे छोटेसे गाव. आई आशाबाई, वडील वाल्मिक आणि लहान भाऊ विकास असे हे छोटे शेतकरी कुटुंब. वैभवचे प्राथमिक शिक्षण तामसवाडीतील मविप्र समाजाच्या जनता विद्यालयात तर माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण मविप्रच्याच मांजरगाव येथील जनता विद्यालयात झाले. शाळा-महाविद्यालयातदेखील विविध स्पर्धांमध्ये वैभवने यश मिळविले आहे. परंतु धावण्याच्या स्पर्धेतच दुखापत झाल्याने मध्ये काही काळासाठी त्याचे धावणे थांबले होते. परंतु त्याचे मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. अशातच त्याची दिल्लीमध्ये सुफिया खान या प्रशिक्षकाबरोबर भेट झाली. त्यांनी महाराष्ट्रातून अद्याप असा विक्रम कोणी केलेला नाही, असे सांगताच वैभवने ‘तो’ विक्रम करण्याची खुणगाठ बांधली आणि तिथूनच खऱ्या अर्थाने प्रवास सुरु झाला. 

डिसेंबर २०२१ पासून नाशिकमधील सायकलिस्ट डॉ. महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज २ ते ३ तास सराव सुरु केला. तीन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर दि. ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी काश्मीरच्या श्रीनगरमधील लाल चौकातून वैभवने या मोहिमेला सुरुवात केली. कडाक्याची थंडी, ऊन वारा याची तमा न बाळगता रात्र आणि दिवस धावत वैभवने अवघ्या ४४ दिवस १७ तास आणि १५ मिनिटे इतक्या विक्रमी कमी वेळेत काश्मिर ते कन्याकुमारी हे ४ हजार ११२ कि.मी. अंतर पूर्ण करून ‘सोल रन’मध्ये इतिहास रचला. वैभवच्या या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली असून, सर्वत्र त्याचे स्वागत होत आहे. वैभवला यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तामसवाडीचे गुरुदेव कांदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. 

शेतकरी कुटुंबातून असल्याने जागतिक स्तरावर विश्वविक्रम करण्याचे स्वप्न बघणे हा महागडा प्रवास वाटायचा. परंतु सुरुवात केल्यावर चारही बाजूने मदत झाली. ग्रामीण भागातून तरुणांनी पुढे येण्याचे धाडस करायला हवे. जेणेकरुन अजून असे विश्वविक्रम भारताच्या नावे होतील. मीदेखील एक सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. आपण जर जिद्दीने ठरवले तर अशक्य असे काहीच नाही. माझ्यासारखा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक युवा विश्वविक्रम करू शकतो, हा विश्वास दृढ झाला.
- कु. वैभव वाल्मिक शिंदे, (विश्वविक्रमवीर) तामसवाडी, निफाड, नाशिक

मविप्रचा माजी विद्यार्थी असलेल्या वैभवची कामगिरी अभिमानास्पद असून, संस्थेच्या अन्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्याच्या जिद्दीचे खरोखर कौतुक करावे तेवढे कमी आहे. यापूर्वीदेखील मविप्रच्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवून संस्थेचा नावलौकिक वाढविला आहे. वैभवच्या या कामगिरीनेही संस्थेच्या नावलौकिकात भर पडणार आहे.
- ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र समाज, नाशिक.

५२ दिवसांचा विक्रम मोडला
काश्मिर ते कन्याकुमारी हे ४ हजार ११२ कि.मी. अंतर यापूर्वी सन २०१९ मध्ये हरयाणा येथील संजयकुमार आणि रतनकुमार या दोघांनी पूर्ण केले आहे. त्यावेळी त्यांना हे अंतर पार करण्यासाठी ५२ दिवस ४ तास ४० मिनिटे इतका कालावधी लागला होता. महिलांमध्ये दिल्लीच्या सुफिया सुफी यांनी ८७ दिवसांमध्ये हे अंतर पूर्ण केल्याची नोंद आहे.

असा होता दिनक्रम
दररोज सरासरी ९० ते १०० किमी धावायचे, त्यानंतरच झोपायचे, असे वैभवने ठरवूनच घेतले होते. ‘सोल रन’ पूर्ण करण्यास किती दिवस लागतील, याचा अंदाज नसल्याने सुरुवातीला तर काही दिवस चालू रनिंगमध्ये जेवण केल्याचे वैभव सांगतो. रस्त्यात अनेक प्रसंग आले, पण वैभव जिद्दीने धावतच राहिला आणि अखेर स्वप्नपूर्ती केलीच. 

१२ राज्यांमधून प्रवास, घडले माणुसकीचे दर्शन
वैभवने १२ पेक्षा जास्त राज्ये आणि ११० हून अधिक शहरांमधून प्रवास केला. यादरम्यान त्याला शेकडो जण भेटले. त्याच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले. अनेकांनी त्याच्या या ध्येयाला सलाम केला. अनेकांनी आर्थिक मदतही देऊ केली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दुध, जेवणही दिले. या सर्व प्रवासात खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडले, असे वैभव आवर्जून सांगतो. 

…असा केला सराव
वैभवने तीन वर्षांपूर्वी डॉ. महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज दोन ते तीन तास धावण्याचा सराव सुरु केला होता. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे दररोज वैभवचा सराव सुरु असायचा. सरावादरम्यान वैभवने नाशिक ते शिर्डी हे अंतर भर पावसांत साडे अकरा तासांत तर, नाशिक ते मालेगाव हे अंतर ४२ अंश सेल्सिअस तापमानात १४ तासांत पूर्ण केले आहे.

मविप्रचा वैभव आता ‘तामसवाडी एक्स्प्रेस’
धावपटू कविता राऊत जशी सावरपाडा या छोट्याशा गावातून आल्याने तिला ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ या नावाने ओळखले जाऊ लागले. आता वैभवने धावण्यामध्ये विश्वविक्रम केल्यामुळे तामसवाडी हे छोटेसे गाव जगाच्या नकाशावर झळकले असून, मविप्रचा माजी विद्यार्थी वैभव ‘तामसवाडी एक्स्प्रेस’ या नावाने ओळखला जाणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group