बीडमधील मस्साजोगचे सरपंच देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला. दरम्यान या हत्या प्रकरणातील आरोपी अजूनही फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. या घटनेविरोधात नागरिकांमध्ये रोष आहे.
या घटनेविरोधात नागरिकांमध्ये रोष असून या घटनेनंतर नागरिकांकडून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली जात आहे. माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. “माजलगाव मतदारसंघाच्या वतीने मृतक संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना एक मदत म्हणून 44 लाख 13 हजार 488 रुपये जमा करून दिले आहेत. अजून तीन ते चार दिवसांमध्ये लोक निधी गोळा करत आहेत. ते झाले की आम्ही आणून देणार आहोत”, अशी माहिती प्रकाश सोळंके यांनी दिली.
“आरोपींना अजूनही अटक झालेली नाही हे दुर्दैवी आहे. तसेच पोलीस यंत्रणा आणि तपास करणाऱ्या यंत्रणालाचं हे अपयश आहे असं मी मानतो. उद्या मी मुंबईला जाऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर देखील हा सगळा वृत्तांत घालणार आहे. दुर्दैवी आहे, बीड जिल्ह्यामधील पोलीस यंत्रणा संबंध उलटून गेलेली आहे”, असं प्रकाश सोळंके म्हणाले.
तसेच पुढे बोलताना ते म्हंणाले “दोषी पोलीस कर्मचारी आणि अधिकार्यांची जिल्ह्यातून हकालपट्टी झाली पाहिजे, अशी आम्ही मागणी करणार आहोत, असं प्रकाश सोळंके म्हणाले. निश्चितपणाने नवीन एसपी आल्याने एक शिस्तीचं वातावरण तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यांचा तसा प्रयत्न चालू आहे. सर्वांनी त्यांना सहकारी केलं पाहिजे. एका दिवसामध्ये काही बदल होत नसतो. गेल्या अनेक वर्षांपासून लागलेली कीड आहे. ही कीड काढायची असेल तर काही कालावधी त्यांना द्यावा लागेल. वेळोवेळी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संपर्कात राहून या तपासात वेग मिळावा असा आमचा प्रयत्न आहे”, असं प्रकाश सोळंके म्हणाले.