बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात आताची सर्वात मोठी माहिती समोर येत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा पुढच्या 24 तासात सरेंडर होणार का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचे 9 पथक तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने 9 पथकं तयार केली आहेत. यामध्ये 150 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांकडून आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. स्कॉर्पिओ गाडीत सापडलेले मोबाईल प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. पण या प्रकरणातील सर्व कॉल, व्हाट्सअप कॉल हे सर्व तपासण्याचं काम सीआयडीकडून सुरु आहे.
दरम्यान, हे काम सुरु असतानाच वाल्मिक कराड यांचं बँक खातं देखील गोठवण्यात आलं आहे. त्याचबरोबर इतर आरोपींचीदेखील बँक खाते गोठवण्यात आले आहेत. तसेच आरोपींच्या नातेवाईकांचे देखील बँक खाते गोठवण्यात आल्याची शक्यता आहे. या सर्व कारवाईनंतर वाल्मिक कराड पुढच्या 24 तासात स्वत:ला सरेंडर करणार का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.