नाशिक : पर्यावरण रक्षणासाठी महावितरणने टाकलेल्या पाऊलाला महावितरणच्या नाशिक परिमंडळातील ४७ हजार १७१ पर्यावरणस्नेही ग्राहकांनी पुढाकार घेत छापील वीजबिल नाकारून कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून ऑनलाईन सेवेच्या पर्यायाचा वापर करीत महावितरणच्या गो-ग्रीन सेवेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे गो-ग्रीन नोंदणी केलेल्या प्रत्येक ग्राहकाची वार्षिक १२० रुपये या प्रमाणे एकूण ४७ हजार १७१ ग्राहकांची ५६ लाख ६० हजार रुपये इतकी वार्षिक बचत होत आहे.
नाशिक परिमंडलातील ग्राहकांना सरळ सोप्या पद्धतीने गो-ग्रीन नोंदणी कशी करावी तसेच गो-ग्रीन नोंदणी केल्यानंतर मिळणारे फायदे दर्शविणारे पोस्टर्स तयार करण्यात आले आहे. सदर पोस्टर्सवर गो ग्रीन माहिती व सोबत या संदर्भातील व्हिडीओचा क्यूआर कोड देण्यात आलेला आहे. ग्राहकांनी मोबाईल च्या माध्यमातून सदर क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर चित्रफितीच्या माध्यमातून गो-ग्रीन नोंदणी कशी करावी या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. सदर पोस्टर्स महावितरणच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्राच्या परिसरात तथा शहरातील कार्यालयात लावण्यात आलेले असून विद्युत ग्राहकांनी सदर पोस्टर्स वरील क्यूआर कोड मोबाईल द्वारे स्कॅन करून चित्रफितीद्वारे दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने गो-ग्रीन नोंदणी करावी. वीजबिलासाठी ई-मेल व एसएमएस चा पर्याय निवडल्याने या ग्राहकांना दर महीन्याला प्रत्येक वीजबिलामागे १० रूपयाची सुट देण्यात येत असून इतरही ग्राहकांनी गो-ग्रीन योजनेत सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाचा व सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.
सद्यस्थितीत नाशिक मंडळात २५ हजार २५१, मालेगाव मंडळातील ३०२५ आणि अहमदनगर मंडळातील १८ हजार ८७५ अशाप्रकारे एकूण नाशिक परिमंडळात ४७ हजार १७१ वीज ग्राहकांनी महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेमध्ये सहभाग घेतला आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महावितरणकडून 'गो-ग्रीन' योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये वीज बिलाच्या छापील कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएस चा पर्याय निवडल्यास वीज ग्राहकांना प्रती बिलात दहा रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीज बिलामध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होणार आहे. विज बिल तयार झाल्यानंतर लगेचच ई-मेल तसेच एसएमएस द्वारे दरमहा विज बिल प्राप्त होत असल्याने ग्राहकांना प्रॉम्प्ट पेमेंट्सह ते तात्काळ घरबसल्या ऑनलाइन द्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे सोबतच ऑनलाईन वीजबिल भरल्यास ग्राहकाला वीजबिलाच्या ०.२५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५०० रुपये पर्यंत सूट मिळते.
वीज ग्राहकांना छापील वीज बिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेल द्वारे प्राप्त झालेले दर महा विज बिल संगणकात सॉफ्ट कॉपी मध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेत स्थळावर चालू वीजबिल यासह मागील अकरा महिन्याचे असे एकूण बारा महिन्याचे वीज बिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत.
आवश्यकतेप्रमाणे वीज ग्राहकांना ते कधीही डाउनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे. महावितरण 'गो-ग्रीन' योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलावर छापलेल्या जीजीएन या क्रमांकाची नोंदणी महावितरण मोबाईल अँपद्वारे किंवा संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंक वर जाऊन करावी. याबाबतची अधिक www.mahadiscom.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी पर्यावरणाच्या समृद्धीसाठी आणि वीज खर्च कमी करण्यासाठी गो-ग्रीन या पर्यायाचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी सोबत दिलेला क्यूआर कोड मोबाईलद्वारे स्कॅन करून चित्रफितीच्या माध्यमातून संपूर्ण माहिती प्राप्त करून गो ग्रीन नोंदणी ग्राहकांनी करावी असे आवाहन महावितरणने केले आहे.
विभाग गो ग्रीन नोंदणी केलेले ग्राहक
कळवण ७२३
मालेगांव ४८२
मनमाड १२६७
सटाणा ५५३
चांदवड १५८८
नाशिक ग्रामीण ३३६०
नाशिक शहर १ ७०४७
नाशिक शहर २ १३२५६